IND vs NZ – मालिका विजयाची नवमी; हिंदुस्थानचा न्यूझीलंडवर सलग तिसरा विजय

यजमान हिंदुस्थानने विजयाच्या हॅ‌ट्ट्रिकसह पाच टी-२० क्रिकेट सामन्यांची मालिका आधीच ३-० फरकाने खिशात टाकण्याचा पराक्रम केला. दुसरीकडे पाहुण्या न्यूझीलंडचे पराभवाच्या हॅट्ट्रिकसह मालिकेतील आव्हानही संपुष्टात आले. हिंदुस्थानचा टी-२० क्रिकेटमधील हा सलग नववा मालिकाविजय ठरला, हे विशेष. पाकिस्तानने सर्वाधिक १० टी-२० मालिका जिंकलेल्या आहेत.

न्यूझीलंडकडून मिळालेले १५४ धावांचे लक्ष्य हिंदुस्थानने ८ फलंदाज आणि तब्बल ६० चेंडू राखून सहज पार केले. लक्ष्याचा पाठलाग करताना संजू सॅमसनला भोपळाही फोडता आला नाही. मॅट हेन्रीने पहिल्याच चेंडूवर त्याचा त्रिफळा उडविला. मात्र, दुसरा सलामीवीर अभिषेक शर्माचे वादळ गुवाहाटीत घोंगावले. त्याने २० चेंडूंत ५ षटकार व ७ चौकारांसह आपली नाबाद ६८ धावांची खेळी सजविली. इशान किशनने १३ चेंडूंत ३ चौकार व २ षटकारांसह २८ धावा फटकाविल्या. इश सोढीने त्याला चॅपमनकरवी झेलबाद केले. मात्र, त्याच्या जागेवर आलेला कर्णधार सूर्यकुमार यादवने नाबाद ५७ धावांच्या खेळीत केवळ २६ चेंडूंत ६ चौकार व ३ षटकारांचा घणाघात केला. त्याने लागोपाठ चौकार ठोकून सामना संपविला.

त्याआधी नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने ९ बाद १५३ अशी असुरक्षित धावसंख्या उभारली. हर्षित राणाने तिसऱ्याच चेंडूवर डेवोन कॉन्वेला (१) पंड्याकरवी झेलबाद करून हिंदुस्थानला सनसनाटी सुरुवात करून दिली. मग हार्दिक पंड्याने धोकादायक रचिन रवींद्रला (४) कुलदीपकडे झेल देण्यास भाग पाडून न्यूझीलंडला दुसरा धक्का दिला. सहाव्या षटकात मोर्चावर आलेल्या जसप्रीत बुमराने पहिल्याच चेंडूवर टीम सेफर्टचा त्रिफळा उडवून न्यूझीलंडची ३ बाद ३४ अशी दुर्दशा केली.

फिलिप्स-चॅपमनचा प्रतिकार

आघाडीची फळी तंबूत परतल्यानंतर ग्लेन फिलिप्स (४८) व मार्क चॅपमन (३२) यांनी चौथ्या विकेटसाठी ४१ चेंडूंत ५२ धावांची भागीदारी करीत हिंदुस्थानी गोलंदाजीचा काही वेळ प्रतिकार केला. फिलिप्सने ४० चेंडूंत ६ चौकारांसह एक षटकार ठोकला, तर चॅपमनने २३ चेंडूंत दोन षटकार व तितकेच चौकार लगावले. फिरकीवीर रवी बिश्नोईने चॅपमनला यष्टीमागे सॅमसनकरवी झेलबाद करून ही जोडी फोडली. त्याच्या जागेवर आलेल्या डॅरिल मिशेलला (१४) हार्दिक पंड्याने किशनकरवी झेलबाद करून हिंदुस्थानला पाचवे यश मिळवून दिले. मग बिश्नोईने फिलिप्सला किशनकडे झेल देण्यास भाग पाडून त्याला अर्धशतकापासून वंचित ठेवले. शेवटी कर्णधार मिचेल सॅण्टनरने १७चेंडूंत ३ चौकार व एका षटकारासह २७ धावा फटकाविल्या म्हणून न्यूझीलंडला दीडशे धावांचा टप्पा ओलांडता आला. हिंदुस्थानकडून बुमराने ३, तर बिश्नोई व पंड्या यांनी २-२ फलंदाज बाद केले. हर्षित राणाने एक बळी टिपला.

Comments are closed.