पत्रकार आणि लेखक मार्क टुली यांचे दिल्लीत निधन झाले.

वयाच्या 90 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास : 2005 मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

प्रसिद्ध लेखक आणि ज्येष्ठ पत्रकार मार्क टुली यांचे रविवारी नवी दिल्लीतील एका खासगी रुग्णालयात निधन झाले. निधनसमयी ते 90 वर्षांचे होते. त्यांच्या निधनाची माहिती एका जवळच्या मित्राने दिली. तसेच त्यांच्यावर उपचार करणाऱ्या मॅक्स हॉस्पिटलनेही एक बुलेटीन जारी केले आहे. ‘विल्यम मार्क टुली यांचे 25 जानेवारी 2026 रोजी दुपारी 2:35 वाजता निधन झाले. मल्टी-ऑर्गन फेल्युअरमुळे त्यांनी उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला’ असे हॉस्पिटलने जाहीर केले आहे. मार्क टुली यांना 2002 मध्ये नाईटहूड पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. तसेच 2005 मध्ये भारत सरकारने त्यांना पद्मभूषण पुरस्काराने गौरविले होते.

पत्रकारितेसाठी अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त करणारे मार्क टुली गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. गेल्या आठवड्यापासून त्यांना दक्षिण दिल्लीतील साकेत येथील मॅक्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. 24 ऑक्टोबर 1935 रोजी कोलकाता येथे जन्मलेले मार्क टुली यांनी 22 वर्षे बीबीसीचे नवी दिल्ली ब्युरो चीफ म्हणून काम केले. ते बीबीसी रेडिओ-4 चा लोकप्रिय कार्यक्रम ‘समथिंग अंडरस्टूड’चे एक प्रतिष्ठित लेखक आणि प्रस्तुतकर्ता देखील होते. त्यांनी लंडनमधील हॅम्पशायरमधील ट्वायफोर्ड स्कूल, मार्लबरो कॉलेज आणि केंब्रिजमधील ट्रिनिटी हॉल येथे शिक्षण घेतले होते.

Comments are closed.