पाकिस्तानने बांगलादेशला उकसवलं! BCB च्या हट्टामुळे स्कॉटलंडला संधी; बीसीसीआयने सांगितली पूर्ण सत्य परिस्थिती
2026 च्या टी-20 वर्ल्ड कपमधून (ICC T20 international world cup 2026) बांगलादेशला आपल्या हट्टीपणामुळे बाहेर पडावे लागले आहे. आता बांगलादेशच्या जागी स्कॉटलंड संघाला विश्वचषकात प्रवेश मिळाला आहे. बांगलादेशने भारतात सुरक्षेचे कारण देत आपले सर्व सामने श्रीलंकेत हलवण्याची विनंती आयसीसीकडे (ICC) केली होती. मात्र, आयसीसीच्या सुरक्षा पथकाने भारताचा दौरा केल्यानंतर बांगलादेशची विनंती फेटाळून लावली आणि भारत त्यांच्या संघासाठी पूर्णपणे सुरक्षित असल्याचे सांगितले. दरम्यान, या वादावर बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांचे मोठे विधान समोर आले आहे. ते म्हणाले की, पाकिस्तानने बांगलादेशला भारताविरुद्ध उकसवले, जे पूर्णपणे चुकीचे आहे.
एएनआय (ANI) शी बोलताना राजीव शुक्ला म्हणाले, आमची इच्छा होती की बांगलादेशने या स्पर्धेत खेळावे आणि आम्ही सुरक्षेचे पूर्ण आश्वासन दिले होते. परंतु त्यांनी त्यांचा निर्णय आधीच घेतला होता. शेवटच्या क्षणी संपूर्ण वेळापत्रक बदलणे खूप कठीण असते, म्हणूनच स्कॉटलंडला संधी देण्यात आली आहे.
ते पुढे म्हणाले, पाकिस्तान विनाकारण या विषयात ढवळाढवळ करत आहे आणि बांगलादेशला उकसवण्याचा प्रयत्न करत आहे. पाकिस्तानने बांगलादेशच्या जनतेसोबत काय केले आहे हे सर्वांना ठाऊक आहे आणि आता ते त्यांना चुकीच्या मार्गावर नेत आहेत.
सुरक्षेचे कारण देत बांगलादेशने आपला संघ भारतात पाठवण्यास नकार दिला होता. त्यानंतर आयसीसीने त्यांच्या जागी स्कॉटलंडला वर्ल्ड कपचे तिकीट दिले. आयसीसीच्या या निर्णयावर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसिन नकवी यांनी टीका केली होती. तसेच, पाकिस्तान वर्ल्ड कपमध्ये खेळणार की नाही, याचा अंतिम निर्णय देशाचे पंतप्रधान शहबाज शरीफ घेतील, जे सध्या परदेश दौऱ्यावर आहेत. सूत्रांनुसार, पाकिस्तान संघ 2026 च्या वर्ल्ड कपमध्ये भारताविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार (Boycott) टाकण्याची शक्यता आहे.
Comments are closed.