तामिळनाडूत हिंदीला स्थान नाही : स्टॅलिन

हिंदी लादण्याला नेहमीच विरोध करणार : तमिळसाठी आमचे प्रेम कायम राहणार

वृत्तसंस्था/ चेन्नई

तामिळनाडचे मुख्यमंत्री आणि द्रमुक अध्यक्ष एम.के. स्टॅलिन यांनी तमिळ भाषा शहीद दिनी रविवारी राज्यभाषेसाठी हुतात्म्या झालेल्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.  यावेळी स्टॅलिन यांनी तामिळनाडूत हिंदीसाठी कुठलेच स्थान नसल्याचे वक्तव्य केले आहे. हिंदी लादण्याच्या कृतीला आम्ही नेहमीच विरोध करणार आहोत. तमिळ भाषेसाठी आमचे प्रेम कधीच संपणार नाही. जेव्हा कधी आमच्यावर हिंदी लादण्यात आली तेव्हा आम्ही तितक्या तीव्रतेने विरोध केला असल्याचा दावा स्टॅलिन यांनी केला. भाषायुद्धात आता आणखी कुणाचा जीव जाणार नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

स्टॅलिन यांनी भाषा शहीद दिनी एक्सवर हिंदीविरोधी आंदोलनाशी निगडित इतिहासाचा एक छोटा व्हिडिओ शेअर केला. यात 1965 मध्ये हिंदीच्या विरोधात झालेल्या संघर्षाशी निगडित छायाचित्रे आहेत. स्टॅलिन यांनी यावेळी द्रमुकचे दिवंगत नेते सी.एन. अण्णादुराई, एम. करुणानिधी यांच्या योगदानाचे स्मरण केले. तामिळनाडूने हिंदीविरोधी आंदोलनाचे नेतृत्व करत उपखंडात विविध भाषिक राष्ट्रीय समुदायांचे अधिकार आणि ओळखीचे रक्षण केले असल्याचा दावा स्टॅलिन यांनी केला आहे. 1964-65 मध्ये पूर्ण तामिळनाडूत हिंदी विरोधी आंदोलनादरम्यान मुख्यकरून आत्महदन करत अनेकांनी स्वत:चे जीव दिले होते.

द्रमुक सातत्याने केंद्र सरकारवर नव्या शिक्षण धोरणाच्या माध्यमातून हिंदी लादण्याचा आरोप करत आहे. स्टॅलिन सरकार आणि केंद्रादरम्यान हिंदी भाषेच्या वापरावरून संघर्ष सुरु आहे. मागील वर्षी मार्च महिन्यात स्टॅलिन यांनी राज्य अर्थसंकल्पाच्या चिन्हावरून रुपयाचे चिन्ह हटवून तमिळ अक्षरात रुपया दर्शविला होता. मुख्यमंत्री स्टॅलिन हे केंद्र सरकारच्या 3 भाषा सूत्राला विरोध करत आहेत. राज्याच्या दोन भाषा शिक्षण धोरणामुळे (तमिळ आणि इंग्रजी) शिक्षण, कौशल्य विकास आणि रोजगाराला लाभ झाला असल्याचे स्टॅलिन यांचे म्हणणे आहे.

Comments are closed.