Winter Storm in US -अमेरिकेत हिमवादळाचा कहर, 29 जणांचा मृत्यू; जनजीवन विस्कळीत

अमेरिकेत सुरू असलेल्या भीषण हिमवादळामुळे आतापर्यंत 29 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. या बदलत्या हवामानामुळे लाखो नागरिकांना कडाक्याची थंडी, वीजपुरवठा खंडित होणे आणि वाहतुकीच्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. ईशान्य कडील राज्यांमध्ये सोमवारी प्रचंड बर्फवृष्टी झाली, तर दक्षिण भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे तेथील नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. अनेक ठिकाणी बर्फवृष्टीत लोक अडकल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
राष्ट्रीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पिट्सबर्गच्या उत्तरेकडील भागात 20 इंचांपर्यंत बर्फवृष्टी झाली असून तेथे तापमान उणे 25 अंश फॅरेनहाइटपर्यंत खाली घसरले आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे शाळांना सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. अनेक शहरांमध्ये संचारबंदीसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच 1,300 मैल परिसरात एक फुटापेक्षा जास्त बर्फ साचल्याने महामार्ग बंद करण्यात आले आहेत.
या वादळाचा विमान वाहतुकीवरही मोठा परिणाम झाला आहे. सोमवारी 8 हजारांपेक्षा जास्त उड्डाणे उशिराने धावत होती तर काही उड्डाणे रद्द करण्यात आली. तसेच रविवारी देखील अमेरिकेतील निम्म्याहून अधिक उड्डाणे रद्द करावी लागली. सध्या देशात 6,70,000 पेक्षा जास्त घरांचा वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकां अंधारात आणि थंडीत दिवस काढावे लागत आहेत.
या वादळात विविध राज्यांमध्ये मृत्यूच्या घटनांची नोंद झाली आहे. मॅसॅच्युसेट्स आणि ओहायोमध्ये बर्फ हटवणाऱ्या यंत्रांखाली (स्नोप्लो) चिरडून दोन जणांचा मृत्यू झाला, तर आर्कान्सा आणि टेक्ससमध्ये घसरगुंडी (स्लेडिंग) करताना झालेल्या अपघातात लहान मुलांचा मृत्यू झाला आहे. तसेच न्यूयॉर्क शहरात कडाक्याच्या थंडीमुळे आठ जणांचे मृतदेह आढळले, तर कॅन्ससमध्ये एका महिलेचा मृतदेह बर्फाखाली दबलेल्या अवस्थेत सापडला.

Comments are closed.