दिनाकरन यांचा तामिळनाडूत एनडीएमध्ये प्रवेश
अण्णाद्रमुक महासचिव पलानिस्वामी यांनी केले स्वागत : द्रमुकला पराभूत करण्यासाठी एकजूट झाल्याचे वक्तव्य
वृत्तसंस्था/ चेन्नई
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तामिळनाडूत राजकीय घडामोडींना वेग आला आहे. टीटीव्ही दिनाकरन यांच्या नेतृत्वाखालील अम्मा मक्कल मुनेत्र कडगम (एएमएमके) हा पक्ष अण्णाद्रमुकच्या नेतृत्वाखालील आघाडीत परतला आहे. यामुळे तामिळनाडू रालोआचे बळ वाढणार आहे. एएमएमकेचे संस्थापक दिनाकरन यांनी भाजप नेते तसेच केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांच्या भेटीनंतर रालोआत प्रवेश केला आहे. रालोआत पुन्हा प्रवेश ही एक नवी सुरुवात आहे. तामिळनाडूत नवे सरकार स्थापन करण्यासाठी सर्व ‘अम्मा’ (जे. जयललिता) यांचे समर्थक एकजूट होतील असे उद्गार दिनाकरन यांनी काढले आहेत.
सद्यकाळात अण्णाद्रमुक हा पक्ष तामिळनाडूत रालोआचे नेतृत्व करत आहे. अण्णाद्रमुकचे महासचिव एडप्पादी के. पलानिस्वामी यांनी दिनाकरन यांचे रालोआत स्वागत केले. यापूर्वी 7 जानेवारी रोजी डॉ. अंबुमणि रामदास यांच्या नेतृत्वाखालील पीएमके हा पक्ष रालोआत सामील झाला होता. वाईट शक्ती असलेल्या द्रमुकच्या अत्याचारी शासनाला संपुष्टात आणणे, त्याच्या घराणेशाहीच्या राजकारणाला संपविणे आणि पुन्हा एकदा अम्मांच्या (जे. जयललिता) सोनेरी शासनाला सुनिश्चित करण्यासाठी रालोआ सज्ज असल्याचे सोशल मीडियावर पोस्ट करत पलानिस्वामी यांनी दिनाकरन यांचे स्वागत केले आहे.
दिवगंत माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या अत्यंत निकटवर्तीय राहिलेल्या व्ही.के. शशिकला यांचे दिनाकरन हे पुतणे आहेत. दिनाकरन यांची 2017 साली अण्णाद्रमुकमधून हकालपट्टी करण्यात आली होती. तेव्हा पलानिस्वामी हे पक्षाचे सह-समन्वयक तर ओ. पन्नीरसेल्वम हे समन्वयक होते. तर पुढील काळात पन्नीरसेल्वम यांनाही 2022 मध्ये पक्षातून काढून टाकण्यात आले होते.
पूर्वी का सोडला होता रालोआ?
दिनाकरन हे यापूर्वी देखील रालोआचा हिस्सा राहिले आहेत. दिनाकरन यांनी सप्टेंबर 2024मध्ये रालोआपासून अंतर राखले होते. त्यावेळी त्यांनी अण्णाद्रमुक महासचिव पलानिस्वामी यांच्यावर ‘अहंकारा’चा आरोप करत त्यांच्या नेतृत्वाला विरोध केला होता. रालोआतून बाहेर पडल्यावर दिनाकरन यांनी अभिनेता विजय यांचा पक्ष टीव्हीकेसोबत आघाडीची शक्यता पडताळून पाहिली होती. परंतु दोन्ही पक्षांदरम्यान सहमती होऊ शकली नव्हती.
अमित शाह यांच्या भेटीनंतर बदलली स्थिती
अलिकडेच दिनाकरन यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. या भेटीदरम्यान दिनाकरन यांना पुन्हा रालोआत सामील होण्याचे निमंत्रण देण्यात आले होते असे सांगण्यात येत आहे.
पंतप्रधान मोदींच्या सभेत सामील
रालोआत परतल्यावर दिनाकरन हे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या चेन्नईनजीक होणाऱ्या 23 जानेवारी रोजी होणाऱ्या जाहीर सभेत सामील होण्याची शक्यता आहे. या सभेला अण्णाद्रमुक नेते ई. पलानिस्वामी समवेत रालोआचे अनेक मोठे नेते उपस्थित राहणार आहेत.
थेवर समुदायावर भाजपचे लक्ष
दिनाकरन आणि अण्णाद्रमुकचे अन्य वरिष्ठ नेते ओ. पन्नीरसेल्वम दोघेही दक्षिण तामिळनाडूच्या प्रभावशाली थेवर समुदायाशी संबंधित आहेत. दिनाकरन हे रालोआत परतल्याने या समुदायाची मते एकजूट होऊ शकतात असे भाजपचे मानणे आहे. परंतु पन्नीरसेल्वम यांचे समर्थक अन्य पक्षांमध्ये सामील झाल्यावर त्यांच्या वापसीवरुन स्थिती स्पष्ट नाही.
Comments are closed.