तू सदैव आठवणीत राहशील… सुप्रसिद्ध रील स्टार प्रथमेश कदमचं निधन

सोशल मीडियावर इन्फ्लुएन्सर आणि मराठमोळा रील स्टार प्रथमेश कदमचे निधन झाले आहे. गेल्य़ा काही दिवसांपासून तो आजारी असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. दरम्यान सोमवारी त्याच्या काही मित्रांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली आहे. प्रथमेशच्या अकाली निधनाने त्याच्या कुटुंबियांना तसेच त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
सोशल मीडियावर रीलस्टार प्रथमेश आणि त्यांची आई प्रज्ञा कदम ही माय लेकाची जोडी फार फेमस होती. त्यांच्या सोशल मीडिावरील कॉन्टेंटचं नेटकऱ्यांसह अनेक सेलिब्रिटी कलाकरांकडून कौतुक होत होतं. वडिलांच्या निधनानंतर प्रथमेशने त्याच्या कुटुंबाची जबाबदारी सांभाळली होती. मात्र आधी नवरा आणि आता मुलाच्य़ा जाण्याने प्रथमेशच्या आईवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
प्रथमेशचा जवळचा मित्र तन्मय पाटेकरने त्याच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. ‘तू सदैव आठवणीत राहशील प्रथमेश. देवाघरी स्वत:ची काळजी घे रे, खूप आठवण येईल तुझी, मिस यू भाई’, अशा शब्दांत त्याने भावना व्यक्त केल्या आहेत. प्रथमेशच्या निधनामागचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालं नसून आजारपणामुळे त्याचे निधन झाल्य़ाची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

Comments are closed.