सोन्याच्या चैनीसाठी मित्रानेच काढला मित्राचा काटा; गडचिरोलीतील आरडी एजंट प्रकरणाचा उलगडा

गडचिरोली क्राईम न्यूज: गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यात आलापल्ली परिसरात घडलेल्या आरडी एजंटच्या हत्येचा थरारक उलगडा अखेर अहेरी पोलिसांनी केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे ही हत्या कुण्या अनोळखी व्यक्तीने नव्हे, तर मित्रानेच मित्राच्या सोन्याच्या चैनसाठी रचलेल्या कटातून झाल्याचे निष्पन्न झाले आहे. आरोपीने आधी दारू पाजली अन् नंतर संधी साधत सत्तूरने वार करून निर्घृण हत्या केली.

आलापल्ली येथील पतसंस्थेत अभिकर्ता म्हणून काम करणारे रवींद्र नामदेवराव तंगडपल्लीवार (वय 49, रा. नागेपल्ली) हे 18 जानेवारी रोजी सकाळी साडेअकरा वाजता “पतसंस्थेत पैसे भरायला जातो” असे कुटुंबीयांना सांगून घराबाहेर पडले होते. मात्र रात्रीपर्यंत ते घरी परतले नाहीत. दुसऱ्या दिवशी आलापल्ली–सिरोंचा मार्गावरील नागमाता मंदिराजवळ त्यांचा रक्तबंबाळ अवस्थेतील मृतदेह आढळून आला. धारदार शस्त्राने वार करून त्यांची हत्या करण्यात आल्याचे स्पष्ट झाले.

Gadchiroli Crime News: सोन्याची चैन लुटण्याचा कट आखला

घटनेनंतर अहेरी पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवली. ठसेतज्ज्ञ व न्यायवैद्यक शास्त्राच्या पथकाला पाचारण करून घटनास्थळावरून पुरावे गोळा करण्यात आले. तसेच दोन स्वतंत्र पथके आरोपीच्या शोधासाठी रवाना करण्यात आली. तिसऱ्या दिवशी पोलिसांनी या हत्येचा छडा लावत समय्या मलय्या सुंकरी (वय 35, रा. मद्दीगुडम, ता. अहेरी) याला अटक केली. तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपी समय्या याला दारूचे प्रचंड व्यसन होते. दारू पिण्यासाठी त्याच्याकडे पैसे नसल्याने त्याने मित्र रवींद्र यांच्या गळ्यातील सोन्याची चैन पाहून ती लुटण्याचा कट आखला.

Gadchiroli Crime News: मद्यप्राशन केल्यानंतर सत्तूरने केला हल्ला

आरडी काढायची आहे, असे सांगत त्याने रवींद्र यांना फोन करून बाहेर बोलावले. त्यानंतर दोघेही सिरोंचा मार्गावरील नागमंदिर परिसरातील निर्जन स्थळी गेले. तेथे मद्यप्राशन केल्यानंतर रवींद्र पूर्णपणे नशेत असल्याची खात्री झाल्यावर आरोपीने सत्तूरने त्यांच्यावर अचानक हल्ला केला. जीव वाचवण्यासाठी रवींद्र यांनी हाताने प्रतिकार केला असता त्यांच्या बोटांवर घाव बसून बोटे कापली गेली. तरीही आरोपी थांबला नाही. रवींद्र यांचा मृत्यू होईपर्यंत त्याने सत्तूरने अनेक वार केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Gadchiroli Crime News: आरोपीला 28 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी

हत्या केल्यानंतर आरोपी सोन्याची चैन घेऊन फरार झाला होता. मात्र पोलिसांच्या कसून तपासामुळे अखेर त्याला अटक करण्यात आली. न्यायालयाने आरोपीला 28 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी अजय कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हर्षल एकरे करीत आहेत.

आणखी वाचा

Nagpur Crime News: एकतर्फी प्रेमाचा भयंकर अंत, विवाहित शेजाऱ्याने 23 वर्षीय तरुणीला संपवलं, नंतर मृतदेह फॅनला लटकावला अन्…; घटनेनं नागपूर हादरलं!

आणखी वाचा

Comments are closed.