Jaya Ekadashi 2026: कधी आहे जया एकादशी? जाणून घ्या व्रताचे महत्त्व आणि नियम

प्रत्येक एकादशी तिथीला वेगळे महत्त्व आहे. माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला जया एकादशी म्हटले जाते. जो भक्त या दिवशी प्रेमाने श्रीकृष्णाचे स्मरण, नामस्मरण किंवा ध्यान करतो, त्याच्या जीवनातील सर्व संकटे स्वतः भगवान वासुदेव दूर करतात अशी मान्यता आहे. त्यानिमित्त यंदा जया एकादशी कधी आहे? आणि या दिवशी काय करावे? हे जाणून घेऊया…. ( Jaya Ekadashi 2026 Date And Significance )

कधी आहे जया एकादशी?

पंचांगानुसार, माघ शुक्ल एकादशी 28 जानेवारी रोजी संध्याकाळी 4 वाजून 34 मिनिटांनी सुरू होईल आणि 29 जानेवारी रोजी दुपारी 1 वाजून 56 मिनिटांनी समाप्त होईल. उदय तिथीनुसार जया एकादशीचे व्रत 29 जानेवारी 2026, गुरुवारी पाळले जाईल. या एकादशीला दोन प्रकारे व्रत केले जाते. निर्जला आणि फलाहारी. या दिवशी श्रीकृष्णाला फळे, पंचामृत यांचा नैवेद्य दाखवला जातो. दिवसभर केवळ पाणी आणि फळांचे सेवन करणे श्रेष्ठ मानले जाते.

अशी करा विष्णूची उपासना

एका चौरंगावर पिवळे वस्त्र टाकून भगवान विष्णूंची प्रतिमा स्थापित करावी. धूप-दीप लावून कलश स्थापना करावी. त्यानंतर वस्त्र, तुळस, फळे, फुले, पान आणि सुपारी, कुंकू, अक्षता अर्पण करावी. संध्याकाळी जया एकादशीची व्रत कथा ऐकून फलाहार घ्यावा. शक्य असल्यास रात्री भगवान विष्णू किंवा श्रीकृष्णाच्या मंत्रांचा जप करावा. देवाला फळे, पंचामृताचा नैवेद्य दाखवावा.

हेही वाचा: Surya Arghya Vidhi: सूर्याला अर्घ्य देण्याची योग्य पद्धत कोणती?

या चुका टाळा

जया एकादशीच्या दिवशी काही चुका टाळा. जसे की, तामसिक भोजन, नकारात्मक विचार आणि चुकीच्या वागणुकीपासून दूर राहावे. शास्त्रांनुसार, एकादशीला भात खाणे टाळावे. वादविवादांपासून दूर राहून ”ॐ नमो भगवते वासुदेवाय” या मंत्राचा जप करावा. एकादशीला तुळशीची पाने तोडू नयेत. तुम्ही पूजेसाठी एक दिवस आधी तुळशीची पाने तोडू शकतात. या दिवशी गरजू लोकांना काही वस्तू दान कराव्या. पिंपळ आणि केळीच्या झाडाखाली तुपाचा दिवा लावणे अत्यंत शुभ मानले जाते.

( Disclaimer: येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. ‘Tezzbuzz.com’ आणि ‘Only मानिनी’ त्याची हमी देत नाही. )

Comments are closed.