T20 WC26: पाकिस्तानचा संघ गोंधळात टाकणारा! बीबीएलमध्ये उत्तम कामगिरी करणारा बाहेर अन् वाईट…

टी२० विश्वचषक २०२६साठी पाकिस्तानने संघ जाहीर केला. यामध्ये अनेक अनुभवी खेळाडूंना संघात जागा दिली गेली नाही. या स्पर्धेत पाकिस्तान सलमान आगाच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे. त्यांनी संघ जरी जाहीर केला तरी ते या स्पर्धेत खेळणार की नाही हे त्यांचे अध्यक्ष मोहसीन नकवींच्या एका विधानामुळे निश्चित नाही.

बांग्लादेश क्रिकटने या स्पर्धेतून माघार घेतल्यावर पाकिस्तान क्रिकेट बोर्डचे अध्यक्ष नकवी यांनी पाकिस्तानही या स्पर्धेत खेळणार की नाही ही अशी शंका व्यक्त केली होती. या स्पर्धेआधी पाकिस्तान घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी२० मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी जो संघ जाहीर केला त्यातील केवळ वेगवान गोलंदाज मोहम्मद वसीम ज्युनियर विश्वचषक संघाचा भाग नाही.

“आम्ही संघ निवडताना आमचे काम नीट करतो. आमच्याकडे विश्वचषकासाठी संघ निवडण्यासाठी अधिक वेळ नव्हता. आम्ही एकदम शेवटच्या क्षणी संघ जाहीर केला. या स्पर्धेत खेळण्याबाबत आमचे सरकार निर्णय घेतील, त्यासाठी मी काहीही करू शकत नाही,” असे पाकिस्तान संघनिवड अधिकारी आकिब जावेद म्हणाले.

टी२० विश्वचषकासाठी संघ जाहीर करण्यासाठी आयसीसीने ३० जानेवारीपर्यंत मुदत दिली होती. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत खेळाडूंची कामगिरी पाहून संघ जाहीर करण्यापर्यंत पाकिस्तानकडे वेळ नव्हता. त्यामुळे हॅरिस रौफला संघातील स्थान गमवावे लागले. त्याने नुकत्याच झालेल्या बिग बॅश लीग २०२५-२६च्या हंगामात सर्वाधिक विकेट्स घेण्याची कामगिरी केली आहे.

रौफ पाकिस्तानसाठी शेवटचा टी२० सामना आशिय कप २०२५मध्ये खेळला होता. भारताविरुद्धच्या त्या सामन्यात त्याने खराब कामगिरी केली होती. त्याने १५व्या षटकात १७धावा, १८व्या षटकात १३ धावा दिल्या होत्या. या सामन्याच्या शेवटच्या षटकात भारताला विजयासाठी १० धावांची आवश्यकता होती. तेव्हाही त्याने वाईट कामगिरी केली आणि भारताने तो सामना जिंकला. तेव्हाच त्याला कळून चुकले असेल की त्याची पाकिस्तान संघातील जागा गेली.

दुसरीकडे पाकिस्तानने अनुभवी फलंदाज बाबर आझमला संघात घेतले तर मोहम्मद रिझवानला दुर्लक्षित केले. बाबरही बीबीएलच्या या हंगामात खेळला. त्याने ११ डावांमध्ये २०२ धावा केल्या होत्या. बीबीएलच्या कोणत्याही हंगामात सर्वाधिक कमी सरासरी असताना २०० धावा करण्याचा कारनामा करणारा बाबर हा एकमेव. या स्पर्धेत तो सिडनी सिक्सर्सकडून खेळला.

या स्पर्धेतील एका सामन्यात बाबर आणि स्टिव्ह स्मिथमध्ये धाव घेण्यावरून मतभेद झाले होते. त्या सामन्यात स्मिथने एकेरी धाव घेण्यास त्याला मनाई केली होती. त्यावरून बाबरने बाद झाल्यानंतर बॅट आपटत राग व्यक्त केला होता. त्या सामन्यानंतरही तो चांगला खेळू शकला नाही. त्याने पुढील दोन सामन्यात केवळ एक धाव केली होती. नंतर त्याला राष्ट्रीय संघासाठी पाकिस्तानने परत बोलावले. बाबर त्याच्या कारकिर्दीत पहिल्यांदाच पाकिस्तानच्या टी२० विश्वचषकासाठी कर्णधारपद सांभाळणार नाही.

पाकिस्तानच्या टी२० विश्वचषकाच्या संघात शाहीन शाह आफ्रिदी, सलमान मिर्झा आणि नसीम शाह यांच्यावर वेगवान गोलंदाजीचा भार असणार आहे. या स्पर्धेत पाकिस्तानचा समावेश अ गटात आहे. त्यांचा पहिला सामना ७ फेब्रुवारीला नेदरलॅंड्सविरुद्ध आहे. हा सामना कोलंबोमध्ये खेळला जाणार आहे.

Comments are closed.