पाकिस्तानात बनावट पिझ्झा हटचे उद्घाटन, संरक्षणमंत्र्यांची सोशल मीडियावर खिल्ली

पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी सियालकोट कॅन्टोनमेंटमध्ये एका नामंकित पिझ्झा हट ब्रँडच्या एका आउटलेटचे उद्घाटन केले. पण काही तासांनंतर पिझ्झा हट कंपनीने हे आउटलेट बनावट असल्याचे सांगितले. त्यामुळे पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांची सोशल मीडियावर प्रचंड खिल्ली उडवली जात आहे.
सोशल मीडियावर उद्घाटनाचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पिझ्झा हट कंपनीने निवेदन जारी करून स्पष्ट केले की, या आउटलेटशी त्यांचा कोणताही संबंध नाही. सियालकोट कॅन्टोनमेंटमध्ये उघडलेले हे रेस्टॉरंट पिझ्झा हटच्या नावाचा आणि ब्रँडचा गैरवापर करत आहे. हे पिझ्झा हट इंटरनॅशनलच्या रेसिपी, गुणवत्ता प्रोटोकॉल, अन्न सुरक्षा आणि ऑपरेशनल मानकांचे पालन करत नाही. कंपनी एवढ्यावरच थांबली नाही तर आपल्या ट्रेडमार्कचा गैरवापर थांबवा यासाठी संबंधित अधिकाऱ्यांकडे औपचारिक तक्रार दाखल केली आहे. तसेच यावर तत्काळ कारवाईची मागणी केली आहे.
पाकिस्तानमध्ये कंपनीचे एकूण 16 अधिकृत आउटलेट आहेत. यापैकी 14 लाहोर आणि दोन इस्लामाबादमध्ये आहे, असे कंपनीने म्हटले आहे. जगातील प्रसिद्ध फूड चेन पिझ्झा हट हा एक आंतरराष्ट्रीय पिझ्झा रेस्टॉरंट ब्रँड आहे. हा ब्रँड पिझ्झा, पास्ता आणि फास्ट फूडसाठी ओळखला जातो आणि जगातील 100 हून अधिक देशांमध्ये त्याचे आउटलेट आहेत. पिझ्झा हट अमेरिकेतील मोठी फूड कंपनी यम ब्रँड्सच्या अंतर्गत येते. यम ब्रँड्सकडे केएफसी आणि टॅको बेलसारखे मोठे ब्रँडदेखील आहेत.

Comments are closed.