भारतात टी 20 वर्ल्ड कप खेळणार नाही, बांगलादेश सरकारचा मोठा निर्णय, वर्ल्ड कपवर बहिष्कार

ढाका: बांगलादेश सरकारनं भारतात टी 20 वर्ल्ड कप खेळण्यास नकार दिला आहे. आयसीसीनं बांगलादेशला काल इशारा देत भारतात टी 20 वर्ल्ड कप खेळावा लागेल असं सांगितलं होतं. बांगलादेश सरकारच्या निर्णयानुसार बांगलादेश क्रिकेट बोर्डानं यापूर्वी त्यांचे सामने सुरक्षेच्या कारणामुळं श्रीलंकेत खेळवावेत, अशी मागणी केली होती. मात्र, आयसीसीनं बांगलादेश क्रिकेट बोर्डासोबत चर्चा केली होती. बांगलादेशच्या बोर्डाला 21 जानेवारीपर्यंत अंतिम निर्णय कळवण्यासाठी मुदत दिली होती. बांगलादेश त्यांच्या भूमिकेवर ठाम असून त्यांनी भारतात टी 20 वर्ल्ड कप खेळण्यास नकार दिला आहे.

Bangladesh Govt : भारतात न खेळण्याचा बांगलादेश सरकारचा निर्णय

मुस्तफिजूर रहमानला आयपीएलमधून वगळल्यानं बांगलादेश क्रिकेट बोर्डानं प्रतिष्ठेचा विषय करत त्यांचे सामने श्रीलंकेत खेळवावेत, अशी भूमिका घेतली होती. याशिवाय बांगलादेशनं आयसीसीला त्यांचा ग्रुप बदलण्याची मागणी केली होती. मात्र, बांगलादेशनं केलेली मागणी आयसीसीनं फेटाळून लावली होती.

बांगलादेश क्रिकेट बोर्डाच्या पदाधिकाऱ्यांनी सुरक्षेच्या कारणांमुळं बांगलादेश सरकारनं भारतात क्रिकेट सामने खेळू नयेत, अशी भूमिका घेतल्याचं सांगितलं. भारतात टी 20 वर्ल्ड कप न खेळण्याचा निर्णय बांगलादेश सरकारचा असून तो बांगलादेश क्रिकेट बोर्डाचा नसल्याचं देखील सांगण्यात आलं आहे.

आम्हाला श्रीलंकेत खेळायचंय

बांगलादेश क्रिकेट बोर्डाच्या प्रतिनिधींनी टी 20 वर्ल्ड कपचे सामने श्रीलंकेत खेळायचं असल्याचं म्हटलं आहे. मात्र, आयसीसीनं बांगलादेशची मागणी धुडकावून लावली आहे. बांगलादेशनं टी 20  वर्ल्ड कपवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतल्यानं आता त्यांच्या जागी स्कॉटलंडला संधी मिळण्याची शक्यता आहे.

बांगलादेशनं भारतात न येण्याचा निर्णय का घेतला?

भारत आणि श्रीलंका यांच्याकडून टी 20 वर्ल्ड कपचं आयोजन करण्यात येत आहे. पाकिस्तानचे सामने श्रीलंकेत खेळवले जाणार आहेत. दुसरीकडे बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराचा विरोध म्हणून भारतात सोशल मीडियावर एक मोहीम राबवण्यात आली. त्या मोहिमेद्वारे कोलकाता नाईट रायडर्सचा मालक शाहरुख खानला ट्रोल करण्यात आलं. केकेआरच्या संघात बांगलादेशचा क्रिकेटपटू मुस्तफिजूर रहमान असल्यानं शाहरुख खान विरोधात पोस्ट करण्यात आल्या होत्या. या सर्वाची दखल घेत बीसीसीआयनं केकेआरला मुस्तफिजूर रहमान याला आयपीएलमधून वगळण्याचे आदेश दिले होते. केकेआरनं बीसीसआयच्या आदेशाचं पालन करत मुस्तफिजूर रहमानला संघातून बाहेर काढलं होतं. यानंतर बांगलादेश क्रिकेट बोर्डानं भारतात टी 20 वर्ल्ड कपचे सामने खेळण्यास नकार दिला.

टी 20  वर्ल्ड कपवर बहिष्कार, बीसीबी आर्थिक संकटात सापडणार?

आयसीसी टी 20 वर्ल्ड कपमधील सहभागामुळं बांगलादेश क्रिकेट बोर्डाला जी रक्कम मिळणार होती, ती आता मिळणार नाही. बांगलादेश क्रिकेट बोर्डाला आयसीसीकडून आर्थिक दंड केला जाऊ शकतो. याशिवाय बीसीसीआयविरुद्ध गेल्यानं बांगलादेशचं मोठं नुकसान होऊ शकतं.

हेदेखील वाचा

आणखी वाचा

Comments are closed.