मुंबई महापौरपदाची आरक्षण सोडत ठरवून केली, किशोरी पेडणेकर यांचा आरोप

मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत जाहीर झाली. मुंबई महानगरपालिकेचे महापौरपद हे खुल्या प्रवर्गासाठी राखीव असणार आहे. पण ही सोडत प्रक्रिया ठरवून केल्याचा आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या मुंबई महानगरपालिकेतील गटनेत्या किशोरी पेडणेकर यांनी केला.

किशोरी पेडणेकर यांनी महापौर पदाच्या आरक्षणावर तीव्र आक्षेप घेतला आहे. त्या म्हणाल्या की, महिला ओबीसी आरक्षण लागू करण्यात आलेले नाही. 2019 ते 2022 या कालावधीत महापौर पद खुल्या प्रवर्गासाठी होते. त्या काळात ओबीसी प्रवर्गाला संधी मिळायला हवी होती. मात्र, ओबीसींवर अन्याय करण्यात आला. निवडणूक होण्याआधी आरक्षणाबाबत स्पष्टता असणे आवश्यक असताना, आता नियम बदलण्यात आले आहेत. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि खुला प्रवर्ग अशा तीन प्रवर्गांमध्येच उमेदवार असणे आवश्यक असल्याचा नियम लादण्यात आला आहे. मुंबईत अनुसूचित जमातीचे केवळ दोन उमेदवार असताना जाणीवपूर्वक असा नियम लागू करण्यात आला, असा आरोपही पेडणेकर यांनी केला.

ही संपूर्ण प्रक्रिया ठरवून आणि लॉटरी पद्धतीने राबवण्यात आली असून, ही लॉटरी प्रणाली आणि त्यामागील निवडणूक प्रक्रियेचा आम्ही ठामपणे धिक्कार आणि निषेध करतो, असेही किशोरी पेडणेकर यांनी स्पष्ट केले.

Comments are closed.