टी20 वर्ल्डकपआधीच ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूची तडकाफडकी निवृत्ती जाहीर, शेवटचा सामना भारताविरुद्ध खेळला
ऑस्ट्रेलियाच्या एका खेळाडूने टी२० विश्वचषक २०२६च्या आधीच निवृत्ती जाहीर केली आहे. त्याने मंगळवारी (२७ जानेवारी) व्यवसायिक क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज केन रिचर्डसनने त्याच्या १७ वर्षाच्या क्रिकेट कारकिर्दीला रामराम ठोकला आहे. त्याने क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती जाहीर केली. त्याने त्याचा शेवटचा सामना भारताविरुद्धच खेळला आहे.
रिचर्डसनने २०१३मध्ये श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यातून त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला सुरूवात केली होती. ३४ वर्षीय या खेळाडूने दुखापतीमुळे हा निर्णय घेतल्याचे समोर येत आहे.
रिचर्डसनच्या व्यवसायिक क्रिकेटची सुरूवात २००९मध्ये झाली. त्याची आंतरराष्ट्रीय कारकिर्द १० वर्षाची राहिली. त्याने शेवटचा सामना २०२३मध्ये खेळला होता. गुवाहाटीत झालेल्या भारताविरुद्धच्या त्या टी२० सामन्यात त्याने एक विकेटही घेतली होती. यामध्ये त्याने इशान किशनला बाद केले होते.
रिचर्डसनने २०१४मध्ये पहिला आंतरराष्ट्रीय टी२० सामना खेळला होता. तो ऑस्ट्रेलियाकडून केवळ वनडे आणि टी२०च्या प्रकारात खेळला आहे. यामध्ये त्याने २५ वनडेत ३९ विकेट्स आणि ३६ टी२० सामन्यात ४५ विकेट्स घेतल्या आहेत.
रिचर्डसन इंडियन प्रिमीयर लीगमध्येही (आयपीएल) खेळला आहे.
Comments are closed.