Footwear Health Risks : स्टाईलची किंमत वेदनांत? चुकीच्या चपलांमुळे तरुण वयातच सुरू होतेय गुडघे-कंबरदुखी
आजकाल कपड्यांइतकीच पादत्राणांचीही चर्चा होते. कोणत्या चप्पला ट्रेंडमध्ये आहेत, कोणते शूज लूकला सूट होतील, याकडे अनेकांचा जास्त कल असतो. मात्र, या फॅशनच्या झगमगाटात एक महत्त्वाचा मुद्दा दुर्लक्षित राहतो, तो म्हणजे पायांचं आरोग्य. चुकीची पादत्राणे वापरल्यामुळे केवळ पायच नाही, तर गुडघे, कंबर आणि पाठदुखीच्या तक्रारी झपाट्याने वाढताना दिसत आहेत.
मानवी पायांची रचना ही नैसर्गिक समतोल आणि हालचालींसाठी तयार झालेली असते. पण सध्या बाजारात मिळणाऱ्या अनेक फॅशनेबल चपला या या नैसर्गिक रचनेशी जुळणाऱ्या नसतात. परिणामी, चालताना शरीराचा भार चुकीच्या पद्धतीने विभागला जातो आणि त्याचा ताण हळूहळू संपूर्ण शरीरावर जाणवू लागतो.
चुकीच्या पादत्राणांचा शरीरावर कसा होतो परिणाम?
अयोग्य चपला किंवा शूज घातल्यामुळे सुरुवातीला फक्त पाय दुखतात असे वाटते. पण हा त्रास तिथेच थांबत नाही. पायांमधील वेदना, सूज किंवा ताण याचा परिणाम पुढे गुडघ्यांवर, नितंबावर आणि कंबरेपर्यंत पोहोचतो. चालण्याची ढब बदलते, देहबोली बिघडते आणि त्यातून दीर्घकाळ टिकणाऱ्या वेदना सुरू होतात.
उंच टाचांचे धोके
उंच टाचांच्या चपला दिसायला आकर्षक असल्या, तरी त्या शरीरासाठी सर्वाधिक त्रासदायक ठरतात. टाच उंच असल्याने शरीराचं वजन पायाच्या पुढील भागावर पडतं. त्यामुळे बोटांवर जास्त दाब येतो, सूज आणि वेदना होतात. मोठ्या अंगठ्याजवळ हाड बाहेर येणं, बोटं वाकडी होणं, घोट्यांमध्ये ताण येणं अशा समस्या वाढतात. याच चुकीच्या पोश्चरमुळे कंबर आणि गुडघेदुखीही सुरू होते.
टोकदार चपलांचा वाढता त्रास
पुढून टोकदार भाग असलेल्या चपला फॅशनमध्ये असल्या, तरी त्या बोटांसाठी योग्य नसतात. अशा चपलांमुळे बोटं एकमेकांवर दाबली जातात. त्यामुळे वेदनादायक गाठी, नख आत वाढणं आणि पायांचा नैसर्गिक आकार बदलण्यासारख्या समस्या निर्माण होतात. दीर्घकाळ अशा चपला वापरल्यास पाय कायमस्वरूपी विकृत होण्याचीही शक्यता असते.
सपाट आणि जड तळाच्या चपलाही सुरक्षित नाहीत
साध्या दिसणाऱ्या सपाट चपलांमध्ये अनेकदा पायाच्या कमानीला आवश्यक आधार नसतो. त्यामुळे चालताना टाच आणि पायांवर जास्त ताण पडतो. यामुळे टाचदुखी, पायांच्या तळव्याचा दाह आणि घोट्यांमध्ये वेदना जाणवतात. त्याचप्रमाणे, जड तळाच्या किंवा प्लॅटफॉर्म चपलांमुळे समतोल बिघडतो आणि घोटा वळण्याचा धोका वाढतो. त्याचा परिणाम गुडघे आणि कंबरेवर होतो.
बदलता फॅशन ट्रेंड आणि वाढता धोका
सोशल मीडियावरील ट्रेंड, सेलिब्रिटी लूक यामुळे स्टाईलसाठी त्रास सहन करावा लागते ही मानसिकता आज अनेकांना चुकीच्या पादत्राणांकडे ढकलत आहे. दीर्घकाळ उभं राहणं, कार्यक्रमांमध्ये सतत फॅशनेबल दिसण्याचा दबाव यामुळे पायांच्या तक्रारी वाढत आहेत. त्यामुळे पूर्वी वय वाढल्यानंतर दिसणाऱ्या समस्या आता तरुण वयातच जाणवू लागल्या आहेत.
काय लक्षात ठेवावं?
पादत्राणे निवडताना केवळ लूक नव्हे, तर आराम, योग्य आधार आणि संतुलन यालाही प्राधान्य देणं गरजेचं आहे. पायांना आराम मिळेल अशी पादत्राणे वापरल्यास केवळ पायच नाही, तर संपूर्ण शरीर निरोगी राहण्यास मदत होते. कारण लक्षात ठेवा, पाय मजबूत असतील तरच शरीराचं संतुलन टिकून राहतं.
Comments are closed.