जो रूट थांबता थांबेना! शतकासह ब्रायन लाराचा विक्रम मोडीत, गांगुली-रोहितही पडले मागे

श्रीलंकेच्या भूमीवर जो रूट थांबता थांबेना झाले आहेत. पहिल्या आणि दुसऱ्या वनडेत अर्धशतके झळकावल्यानंतर, तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात रूटने शानदार फलंदाजी करत शतक ठोकले आहे. श्रीलंकेविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या तिसऱ्या वनडे सामन्यात रूटने आपल्या एकदिवसीय कारकिर्दीतील 20वे शतक 100 चेंडूंमध्ये पूर्ण केले. रूटने या शतकासह ब्रायन लारा यांचा मोठा विक्रम चक्काचूर केला आहे. त्याचबरोबर, एका खास बाबतीत त्याने सौरव गांगुली आणि रोहित शर्मा यांनाही मागे टाकले आहे.

​टॉस जिंकून आधी फलंदाजी करण्यासाठी उतरलेल्या इंग्लंडची सुरुवात चांगली झाली नाही. बेन डकेट फक्त 7 धावा करून बाद झाला. त्यानंतर रेहान अहमद 24 धावा करून बाद झाला. 40 धावांत 2 विकेट गमावल्यामुळे अडचणीत दिसणाऱ्या इंग्लंडचा डळमळीत डाव जो रूटने जेकब बेथेलसोबत मिळून सावरला. रूटने तिसऱ्या विकेटसाठी बेथेलसोबत शतकीय भागीदारी केली. बेथेल 72 चेंडूत 65 धावा करून बाद झाला. मात्र, रूटने एक बाजू लावून धरली आणि आपल्या वनडे कारकिर्दीतील 20 वे शतक पूर्ण केले.

​50 ओव्हरच्या फॉरमॅटमध्ये सर्वाधिक शतके ठोकण्याच्या बाबतीत रूट आता ब्रायन लाराच्या पुढे गेला आहे. लाराने वनडे क्रिकेटमध्ये 19 शतके झळकावली होती, तर रूटच्या आता 20 सेंच्युरी झाल्या आहेत. दुसऱ्या वनडेतही या इंग्लिश फलंदाजाने उत्कृष्ट फलंदाजी करत 75 धावांची दमदार खेळी खेळली होती. तसेच, पहिल्या वनडेत रूटने 62 धावा जोडल्या होत्या.

​जो रूटने आपल्या या खेळी दरम्यान वनडे क्रिकेटमध्ये 7500 धावा पूर्ण केल्या. या फॉरमॅटमध्ये सर्वात जलद 7500 धावा पूर्ण करणारा तो चौथा फलंदाज ठरला आहे. या बाबतीत त्याने रोहित शर्मा आणि सौरव गांगुली यांना मागे टाकले आहे. रूटने हा टप्पा 178 व्या डावात गाठला आहे. तर सौरव गांगुलीला इथपर्यंत पोहोचण्यासाठी 185 डाव लागले होते आणि रोहितने 7500 धावा 188 डावांत पूर्ण केल्या होत्या.

Comments are closed.