IND vs NZ: रायपूरमध्ये भारताचा दबदबा कायम राहणार का? प्लेइंग XI मधून कुणाला बाहेरचा रस्ता

टीम इंडिया शुक्रवारी, 23 जानेवारीला रायपूरमध्ये न्यूझीलंडविरुद्ध दुसरा टी20 सामना खेळणार आहे. नागपूरमध्ये झालेल्या पहिल्या सामन्यात विजय मिळवत भारताने पाच सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. त्यामुळे रायपूरमधील सामन्यात विजय मिळवून मालिकेत 2-0 अशी आघाडी घेण्याचा भारताचा प्रयत्न असणार आहे.

दुसरीकडे, न्यूझीलंड संघासमोर मालिकेत बरोबरी साधण्यासाठी हा सामना जिंकणं आवश्यक आहे. नागपूरमध्ये भारतीय फलंदाज आणि गोलंदाजांनी प्रभावी कामगिरी करत न्यूझीलंडला मोठ्या फरकाने पराभूत केलं होतं. त्यामुळे रायपूरमध्ये किवी संघ कशी कामगिरी करतो, याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

रायपूरमधील शहीद वीर नारायण सिंह आंतरराष्ट्रीय स्टेडियम हे मैदान आतापर्यंत टीम इंडियासाठी भाग्यवान ठरलं आहे. भारताने या मैदानावर खेळलेल्या एकमेव टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात विजय मिळवला आहे. 2023 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळवण्यात आलेल्या त्या सामन्यात सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारताने 19 धावांनी विजय मिळवला होता.

त्या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करत 20 षटकांत 174 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाचा संघ 154 धावांपर्यंतच मजल मारू शकला. भारतीय गोलंदाजांनी त्या सामन्यात प्रभावी कामगिरी करत सामना भारताच्या बाजूने वळवला होता.

रायपूरमध्ये झालेल्या त्या सामन्यात रिंकू सिंगने 46 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली होती. तसेच अक्षर पटेल याने तीन विकेट्स घेत ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजीला खिळ बसवली होती. या दोघांच्या कामगिरीमुळे भारताला विजय मिळवण्यात मोलाची मदत झाली होती.

आता पुन्हा एकदा रायपूरमध्ये भारताचा अजिंक्य रेकॉर्ड कायम राहतो का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. भारताने जर हा सामना जिंकला, तर मालिकेत 2-0 अशी एकतर्फी आघाडी घेण्याची संधी त्यांना मिळणार आहे.

दरम्यान, प्लेइंग ईलेव्हनमध्ये बदल होणार का, याबाबतही चर्चा सुरू आहे. पहिल्या सामन्यात इशान किशन आणि संजू सॅमसन यांना अपेक्षित कामगिरी करता आली नव्हती. त्यामुळे या दोघांपैकी कुणाला विश्रांती दिली जाईल का, की टीम मॅनेजमेंट त्यांच्यावर विश्वास दाखवणार, हे टॉसनंतर स्पष्ट होणार आहे.

उभय संघांमधील दुसऱ्या टी20 आंतरराष्ट्रीय सामन्याला संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होणार आहे.

Comments are closed.