11 चौकार, 9 षटकार… 27 चेंडूत पटकावल्या 90 धावा; हॅरी ब्रूकच्या बॅटने मैदानात माजवला हाहाकार!
कोलंबोच्या आर. प्रेमदासा क्रिकेट स्टेडियमवर हॅरी ब्रूकने आपल्या तुफानी फलंदाजीने सर्वांनाच वेड लावले. पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या इंग्लंडच्या कर्णधाराने बॅटने जबरदस्त कोहराम माजवला. ब्रूकने आपल्या एकदिवसीय (ODI) कारकिर्दीतील तिसरे शतक अवघ्या 57 चेंडूंमध्ये ठोकले. या खेळीत त्याने 11 चौकार आणि 9 गगनचुंबी षटकार खेचले. ब्रूकसमोर श्रीलंकेची गोलंदाजी पूर्णपणे हतबल दिसली. जॅकब बेथेल बाद होऊन माघारी परतल्यानंतर हॅरी ब्रूक क्रीझवर आला, तेव्हा त्याच्यावर धावगती वाढवण्याची जबाबदारी होती. ब्रूकने ही जबाबदारी चोख पार पाडली. जो रूटच्या साथीने त्याने चौथ्या विकेटसाठी 191 धावांची अभेद्य भागीदारी रचली.
एका बाजूने रूटने संयमी खेळ केला, तर दुसऱ्या बाजूला हॅरी ब्रूकने आपल्या स्फोटक फलंदाजीने श्रीलंकेच्या गोलंदाजीच्या चिंधड्या उडवल्या. 66 चेंडूंच्या आपल्या खेळीत इंग्लिश कर्णधाराने 206 च्या स्ट्राईक रेटने खेळत नाबाद 136 धावा केल्या. त्याने 11 वेळा चेंडू सीमापार धाडला, तर 9 वेळा चेंडू थेट प्रेक्षकांमध्ये पाठवून हवाई सफर घडवली.
सुरुवातीचे 39 चेंडू खेळल्यानंतर हॅरी ब्रूक 46 धावांवर खेळत होता. मात्र, त्यानंतर इंग्लंडच्या कर्णधाराने खरी तबाही माजवली. पुढच्या अवघ्या 27 चेंडूंमध्ये ब्रूकने तुफानी फटकेबाजी करत तब्बल 90 धावा कुटल्या. इंग्लंडच्या डावात शेवटच्या ज्या 69 धावा झाल्या, त्यापैकी केवळ 1 धाव जो रूटच्या बॅटमधून आली, तर उर्वरित 68 धावा एकट्या हॅरी ब्रूकने केल्या.
कर्णधाराच्या या झंझावाती खेळीच्या जोरावर इंग्लंडचा संघ 50 षटकांत 3 गडी गमावून धावफलकावर 357 धावा लावण्यात यशस्वी ठरला. जो रूटनेही आपल्या वनडे कारकिर्दीतील 20 वे शतक पूर्ण केले आणि तो 111 धावांवर नाबाद राहिला.
Comments are closed.