चौथ्या सामन्यापूर्वी गोलंदाजी प्रशिक्षकांचे मोठे संकेत; संजू सॅमसनचा खराब फॉर्म चिंतेचा विषय

​पुढील महिन्यात सुरू होणाऱ्या टी20 विश्वचषक 2026 (T20 World Cup 2026) च्या उंबरठ्यावर टीम इंडियासह सर्वच संघ उभे आहेत. भारताकडे आता फक्त 2 सामने शिल्लक आहेत. संघाचे जवळपास सर्वच पत्ते सेट झाले आहेत! मात्र, विश्वचषकात संजू सॅमसनचे भविष्य काय असेल, हे गंभीर अँड कंपनी किंवा देवच जाणे. पण न्यूझीलंडविरुद्ध (Ind vs NZ) बुधवारी विशाखापट्टणम येथे होणाऱ्या चौथ्या टी20 सामन्यापूर्वी भारतीय व्यवस्थापनाने त्याच्याबाबत मोठा इशारा नक्कीच दिला आहे. सामन्याच्या पूर्वसंध्येला गोलंदाजी प्रशिक्षक मॉर्न मॉर्कल यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आणि क्रिकेटच्या जगतात एक प्रकारे ‘फिलॉस्फिकल’ बनलेल्या वाक्यातून सॅमसनबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. त्यांच्या या विधानाचा स्पष्ट अर्थ असा आहे की, व्यवस्थापन त्याला पुढील दोन सामन्यांत खेळवणार आहे. जर सॅमसन चौथ्या सामन्यात अपयशी ठरला, तरी व्यवस्थापन त्याला शेवटच्या सामन्यातही संधी देईल.

​चौथ्या सामन्याच्या पूर्वसंध्येला मॉर्न मॉर्कल यांनी सॅमसनच्या संघर्षावर भाष्य करताना म्हटले की, “हा सलामीवीर खराब फॉर्ममधून बाहेर पडण्यासाठी फक्त एका चांगल्या खेळीच्या अंतरावर आहे.” मात्र, पहिल्या तीन सामन्यांतील अपयशामुळे सॅमसन सध्या प्रश्नांच्या फेऱ्यात अडकला आहे. या तीन सामन्यांत त्याला केवळ 16 धावा करता आल्या आहेत, त्यामुळे आता अनेक तज्ज्ञ आणि मीडियाने म्हणायला सुरुवात केली आहे की, ‘इशान किशनला वरच्या फळीत संधी द्या आणि संघात अधिक चांगले संतुलन निर्माण करा.’

​प्रश्नाचे उत्तर देताना मॉर्कल म्हणाले, “संजू त्याचा आत्मविश्वास आणि फॉर्म परत मिळवण्यापासून फक्त एक खेळी दूर आहे. आमच्यासाठी, विश्वचषकापूर्वी हे महत्त्वाचे आहे की खेळाडूंनी योग्य वेळी आपला सर्वोत्तम फॉर्म मिळवावा. तो उत्तम सराव करत आहे आणि चेंडू चांगल्या प्रकारे हिट करत आहे.” ते पुढे म्हणाले, “पर्यायी नेट सेशन असूनही, सॅमसनने नेटमध्ये 30 मिनिटांहून अधिक काळ घालवला आणि अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती, अभिषेक आणि साईड-आर्मर रघु सारख्या गोलंदाजांचा सामना केला. सुरुवातीच्या काही मिनिटांच्या संघर्षानंतर, तोच जुना सॅमसन पाहायला मिळाला जेव्हा त्याने एसीए-व्हीडीसीए स्टेडियमच्या कानाकोपऱ्यात चेंडू टोलवण्यास सुरुवात केली.”

​यानंतर, केरळच्या या फलंदाजाने मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि फलंदाजी प्रशिक्षक सितांशु कोटक यांच्यासोबत नेटच्या बाजूला प्रदीर्घ चर्चा केली, जिथे श्रेयस अय्यर आपला सराव करत होता. प्रशिक्षक त्याला संयमाने काही गोष्टी समजावून सांगताना दिसले. स्वाभाविकपणे, मॉर्कल सॅमसनच्या फॉर्मबद्दल फारसे चिंतेत दिसले नाहीत आणि त्यांनी सांगितले की संघाचा विजय वैयक्तिक कामगिरीपेक्षा जास्त महत्त्वाचा आहे.

​ते म्हणाले, “मला वाटते की तो पुन्हा लयीत येणे ही केवळ वेळेची बाब आहे, परंतु मुख्य गोष्ट म्हणजे संघ जिंकत आहे आणि हेच सर्वात महत्त्वाचे आहे. आम्ही सध्या मालिकेत 3-0 ने पुढे आहोत आणि मुले खूप चांगले क्रिकेट खेळत आहेत. विश्वचषक सुरू होण्यापूर्वी आमच्याकडे अजून काही सामने आहेत आणि मला खात्री आहे की संजू आपला फॉर्म परत मिळवेल.”

Comments are closed.