पाण्यामुळे रनआऊट! नॉन-स्ट्राईकवर असताना क्रिज सोडली आणि शतकालाही मुकला
भारताच्या स्थानिक क्रिकेटमध्ये रणजी ट्रॉफी २०२५-२६ स्पर्धा सुरू आहे. यामध्ये राष्ट्रीय संघाच्या अनेक खेळाडूंचा सहभाग आहे. त्यामध्ये गुरूवारी (२२ जानेवारी) बंगाल विरुद्ध सर्विसेस यांच्यात खेळल्या गेलेल्या पहिल्या डावामध्ये बंगालचा कर्णधार अभिमन्यू ईश्वरन विचित्र पद्धतीने धावबाद झाला आहे. यामुळे त्याचे शतकही अवघ्या १९ धावांनी मुकले.
ईश्वरन रणजी ट्रॉफीच्या सहाव्या चरणातील सामन्यात नॉन-स्ट्राईकवर असताना विचित्र पद्धतीने धावबाद झाला. यामुळे त्याने प्रथम श्रेणीतील २८वे शतक करण्याची संधी गमावली. यामध्ये त्याचीच चूक होती हे त्याने मान्य केले आहे. ही घटना सामन्याच्या पहिल्या डावातील ४१व्या षटकात घडली. आदित्य कुमार गोलंदाजी करत असताना त्याने चेंडू सुदीप चॅटर्जीला टाकला. बॉल डेड झाला आहे असे समजून ईश्वरन पाणी घेण्यासाठी क्रिज सोडून धावला. तो चेंडू गोलंदाजाच्या बोटांना लागून थेट स्टम्प्सला लागला आणि ईश्वरन बाद झाला.
ईश्वरन क्रिजच्या बाहेर झाल्याचे सर्विसच्या गोलंदांनादेखील कळाले नाही. जेव्हा चेंडू स्टम्प्सला लागला तेव्हा त्यांचे लक्ष ईश्वरनकडे गेले तेव्हा तो क्रिजच्या खूप बाहेर असल्याचे दिसले. त्यानंतर सर्विसेसने पंचाकडे तो बाद असल्याची मागणी केली आणि त्यांनी फलंदाजाला धावबाद दिले. दिवसाचा खेळ संपला असता ईश्वरनने त्याची चूक असल्याचे मान्य केले. तो यावेळी ८१ धावांवर खेळत होता.
ईश्वरन म्हणाला, “आमच्या डावाची सुरूवात चांगली झाली होती. खेळही उत्तम सुरू होता, मात्र मी चूक केली. यावरून चाहते म्हणतील विरोधी संघ खिलाडूवृत्ती दाखवत मला परत बोलावू शकत होती, पण तसे नव्हते. मला वाटले गोलंदाजाने चेंडू पकडला आहे आणि तो डेड झाला असे समजून मी पुढे आलो, मात्र चेंडू गोलंदाजाच्या हाताला लागून स्टम्पला लागला.”
यावरून २०११मध्ये भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्याची आठवण येते. तेथे इयान बेल असाच काहीसा बाद झाला होता. त्यावेळी तेव्हाचा भारताचा कर्णधार एमएस धोनीने त्याला परत फलंदाजीसाठी बोलावले होते. या दोन्ही घटनांच्या तुलनेबाबत बंगालचे मुख्य प्रशिक्षक लक्ष्मी रतन शुक्ला यांना विचारले.
शुक्ला म्हणाले, “दोन्ही घटना सारख्या आहेत, पण तेथे वेगळे संघ होते आणि परिस्थितीही. येथे ईश्वरनचीच चूक होती. तो एक वरिष्ठ खेळाडू असून त्याला जबाबदाऱ्या माहित आहे. क्रिकेटमध्ये अशा प्रकारच्या घटना घडतच असतात. विरोधी संघाने त्याला परत बोलावले नाही यामध्ये त्यांची कोणतीच हरकत नाही. सगळे काही नियमानुसार झाले.”
या सामन्यात सर्विसेसने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. त्याच्या प्रत्युत्तरात पहिला दिवस संपला असता बंगाल पहिल्या डावात ४ विकेट्स गमावत ३४० धावसंख्येवर आहे. चॅटर्जी १४० आणि सुमंता गुप्ता ३१ धावांवर नाबाद आहेत.
Comments are closed.