जनगणना प्रश्नावलीची अधिसूचना जारी

33 प्रश्न जाहीर : पहिल्या टप्प्यात घर, कुटुंब, वाहनांसंबंधी माहिती विचारणार,पहिला टप्पा 1 एप्रिल 2026 पासून सुरू होणार

वृत्तसंस्था/नवी दिल्ली

केंद्र सरकारने गुरुवारी जनगणनेच्या पहिल्या टप्प्यातील प्रश्नावलीसंबंधीची अधिसूचना जारी केली. यामध्ये जनगणनेत विचारल्या जाणाऱ्या 33 प्रश्नांची यादी समाविष्ट असून त्यामध्ये घर, कुटुंब आणि वाहनांशी संबंधित प्रश्नांचा समावेश आहे. जनगणनेदरम्यान कुटुंबप्रमुखाला ही माहिती देणे आवश्यक असेल. केंद्र सरकारने जनगणना दोन टप्प्यात केली जाईल अशी घोषणा यापूर्वीच केली होती. पहिला टप्पा एप्रिल ते सप्टेंबर 2026 पर्यंत चालेल. या टप्प्यात घरांची यादी करणे आणि कुटुंबाचा डेटा गोळा करणे समाविष्ट असेल. दुसरा टप्पा फेब्रुवारी 2027 पासून सुरू होणार असून लोकसंख्या मोजणीला प्रारंभ होणार आहे. रहिवाशांना आपली माहिती स्व-गणना करण्याचा पर्याय दिला जाणार असल्याचे यापूर्वीच केंद्रीय गृह मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

ही जनगणना पूर्णपणे डिजिटल असेल. सुमारे 30 लाख कर्मचारी मोबाइल अॅप्सद्वारे माहिती गोळा करतील. मोबाइल अॅप्स, पोर्टल आणि रिअल-टाइम डेटा ट्रान्सफरमुळे जनगणना मोठ्या प्रमाणात पेपरलेस होईल. हे अॅप्स अँड्रॉइड आणि आयओएस दोन्हीवर काम करतील. जातीशी संबंधित डेटा देखील डिजिटल पद्धतीने गोळा केला जाईल. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच जनगणनेत जातींची गणना समाविष्ट केली जाईल. यापूर्वी, 1931 पर्यंत ब्रिटिश काळात जातीवर आधारित जनगणना केल्या जात होत्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील कॅबिनेट समितीने एप्रिलमध्ये हा निर्णय घेतला. 2011 मध्ये झालेल्या मागील जनगणनेनुसार, भारताची लोकसंख्या जवळपास 121 कोटी इतकी नोंदली गेली होती. यामध्ये जवळपास 51.5 टक्के पुरुष आणि 48.5 टक्के महिला असे वर्गीकरण नोंद झाले आहे.

 

Comments are closed.