भारताचा सर्वात मोठा शत्रू न्यूझीलंडच्या ताफ्यात! शेवटच्या क्षणी टी20 वर्ल्डकपच्या संघात एंट्री
क्रिकेटजगतात फेब्रुवारी महिन्यात पुरूषांच्या टी२० विश्वचषकाला सुरूवात होणार आहे. यासाठी अनेक संघांनी त्यांचे खेळाडू निश्चित केले होते, मात्र अनेकांना दुखापतीमुळे संघातून बाहेर पडावे लागले आहे. यामुळे संघात बदल झाला असून न्यूझीलंडसोबतही असे घडले आहे. त्यांचा वेगवान गोलंदाज स्पर्धेबाहेर झाला असून त्याच्याजागी एकेकाळी भारताला त्रास दिलेल्याचा संघात समावेश करण्यात आला आहे.
न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ऍडम मिल्ने दुखापतीमुळे संघातून बाहेर झाला आहे. त्याला टी२० विश्वचषकासाठी संघात निवडले होते, मात्र लीग क्रिकेटमध्ये त्याला दुखापत झाली. त्याच्याजागी संघात कायले जेमिसनची निवड करण्यात आली आहे. तसे जेमिसनला विश्वचषकासाठी राखीव खेळाडू म्हणून घेतले होते. आता त्याची मुख्य संघात निवड झाली आहे.
जेमिसन हा तोच खेळाडू आहे ज्याने भारताला कसोटी चॅम्पियन होण्यापासून रोखले होते. त्याने आयसीसीच्या पहिल्या कसोटी चॅम्पियनशीपमध्ये भारताविरुद्ध धमाकेदार कामगिरी केली होती. त्याने २०२१मध्ये खेळल्या गेलेल्या त्या सामन्याच्या पहिल्या डावात ३१ धावा देत ५ विकेट्स आणि दुसऱ्या डावात ३० धावा देत २ विकेट्स घेतल्या होत्या. तसेच त्याने २१ धावाही केल्या होत्या. हा सामना न्यूझीलंडने जिंकला आणि जेमिसन सामनावीर ठरला होता.
इंग्लंडच्या साऊथम्प्टन येथे झालेला हा सामना भारतीय क्रिकेट चाहते नक्कीच विसरणार नाही. आता त्याच गोलंदाजाची संघनिवड झाल्याने न्यूझीलंडचे पारडे जड असल्याचे दिसते. सध्या भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात टी२० मालिका खेळली जात आहे. या मालिकेतही जेमिसन खेळत आहे.
विशेष म्हणजे जेमिसनने २०२०मध्ये भारताविरुद्धच कसोटी पदार्पण केले होते. वेलिंग्टनमध्ये खेळल्या गेलेल्या त्या सामन्यात जेमिसनने विराट कोहली, चेतेश्वर पुजारा आणि हनुमा विहारी यांना बाद केले होते. तो सामना यजमानांनी १० विकेट्सने जिंकला होता.
दुसरीकडे मिल्ने दक्षिण आफ्रिकेच्या एसए२० लीगमध्ये खेळताना दुखापतग्रस्त झाला. तो या स्पर्धेत सनरायजर्स ईस्टर्न केपकडून खेळतो. त्याला रविवारी (१८ जानेवारी) एमआय केप टाऊन विरुद्धच्या सामन्यात हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली. त्याची ही दुखापत गंभीर असल्याचे समजते.
न्यूझीलंडच्या टी२० विश्वचषकात मिल्नेच्या जागी जेमिसन असून बाकी राखीव खेळाडू लवकरच जाहीर केला जाईल, असे संघाचे मुख्य प्रशिक्षक रॉब वॉल्टर म्हणाले. ही स्पर्धा ७ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे.
टी२० विश्वचषकासाठी न्यूझीलंडचा सध्याचा संघ-
मिचेल सॅंटनर (कर्णधार), फिन ऍलन, मार्क चॅपमन, मायकल ब्रेसवेल, डॅरिल मिचेल, जेम्स निशम, ग्लेन फिलिप्स, रचिन रविंद्र, डेवॉन कॉनवे, टीम सिफर्ट, जकॉब डफी, लोकी फर्ग्युसन, मॅट हेन्री, इश सोधी, कायले जॅमिसन.
Comments are closed.