बदलापूर अत्याचार प्रकरणानंतर प्रशासन खडबडून जागे, ‘त्या’ स्कूल व्हॅनबाबत धक्कादायक माहिती उघड
बदलापूर क्राईम न्यूज: बदलापूर (Badlapur) पश्चिमेत स्कूल व्हॅनमध्ये चार वर्षांच्या चिमुकलीवर झालेल्या अमानुष अत्याचार प्रकरणानंतर प्रशासन खडबडून जागं झालं असून, कल्याण प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (RTO) संबंधित स्कूल व्हॅनवर कडक कारवाई केली आहे. तपासादरम्यान या स्कूल व्हॅन चालवण्यासाठी कोणतीही वैध परवानगी नसल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. या गंभीर निष्काळजीपणाची दखल घेत RTO ने संबंधित व्हॅनचा परवाना रद्द करत 24 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.
Badlapur Crime News: नेमकं प्रकरण काय?
बदलापूर पश्चिमेकडील एका खाजगी शाळेत शिकणारी चार वर्षांची चिमुकली नेहमीप्रमाणे स्कूल व्हॅनमधून दुपारी घरी परतायची. मात्र, ठरलेल्या वेळेत ती घरी न पोहोचल्याने आईने व्हॅन चालकाला फोन करून विचारणा केली. त्यानंतर सुमारे दीड तास उशिरा चिमुकली घरी परतली, ती अत्यंत घाबरलेल्या अवस्थेत होती. आईने चौकशी केली असता, व्हॅन चालकाने तिच्या गुप्तांगाला हात लावल्याचं चिमुकलीने सांगितलं. यानंतर पालकांनी तत्काळ पोलीस ठाण्यात धाव घेतली.
Badlapur Crime News: आरोपी चालक अटकेत, गुन्हा दाखल
पोलिसांनी तात्काळ कारवाई करत व्हॅन चालकाला अटक केली असून त्याच्यावर गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने संपूर्ण बदलापूर आणि कल्याण परिसरात संतापाची लाट उसळली आहे.
Badlapur Crime News: RTO तपासात धक्कादायक खुलासा
या प्रकरणानंतर कल्याण RTO ने अल्पवयीन मुलीवर ज्या स्कूल व्हॅनमध्ये अत्याचार करण्यात आला होता. त्या व्हॅनवर कारवाई केली आहे. संबंधित व्हॅनला कुठलीही परवानगी नसल्याचे तपासात उघड झाले आहे. व्हॅनचा परवाना रद्द करून त्या व्हॅनला 24 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
Badlapur Crime News: स्कूल व्हॅनची तोडफोड करण्याचा प्रयत्न
दरम्यान, अल्पवयीन मुलीवर अत्याचाराची घटना घडताच राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) च्या महिला कार्यकर्त्यांनी बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात धाव घेतली. यावेळी राष्ट्रवादीच्या नेत्या संगीता चेंदवणकर यांनी संतप्त प्रतिक्रिया देत संबंधित स्कूल व्हॅनची तोडफोड करण्याचा प्रयत्न केला होता. ज्यामुळे परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. बदलापुरात पुन्हा एकदा चिमुकलीवर अत्याचाराची घटना घडल्यामुळे शाळा व्यवस्थापन, स्कूल व्हॅन चालक आणि प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या स्कूल व्हॅन्सवर प्रशासन आणखी कडक कारवाई करणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.