मिंध्यांचा पाठिंबा घेण्याइतपत शिवसेनेवर वाईट वेळ आलेली नाही, संजय राऊत यांचा घणाघात

बाळासाहेबांचा धनुष्यबाण तुम्ही नामर्दांच्या हातात दिला, असा घणाघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केला. तसेच मिंध्यांचा पाठिंबा घेण्याइतपत शिवसेनेवर वाईट वेळ आलेली नाही असेही संजय राऊत म्हणाले.

आज मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले की, आज हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे जन्मशताब्दी वर्ष सुरू झाले आहे. या निमित्ताने देशभरातून विविध मान्यवरांनी शुभेच्छा आणि संदेश पाठवले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही बाळासाहेबांबरोबरचा स्वतःचा फोटो प्रसिद्ध करून बाळासाहेब हे आपले मार्गदर्शक होते, त्यांच्याकडून प्रेरणा आणि ऊर्जा मिळाली, त्यांनी देशाला आणि महाराष्ट्राला दिशा दिली. मात्र हेच नरेंद्र मोदी यांनी बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना फोडली आणि शिवसेनाप्रमुख पदावर एकनाथ शिंदे नावाच्या व्यक्तीला बसवले, असा आरोप राऊत यांनी केला. मग आता नरेंद्र मोदी हे एकनाथ शिंदे यांच्याकडून ऊर्जा, प्रेरणा आणि मार्गदर्शन घेतात का, असा प्रश्न जनतेच्या मनात निर्माण होत असल्याचे त्यांनी सांगितले.

बाळासाहेब ठाकरे हे महान व्यक्तिमत्त्व होते. लोकमान्य टिळकांनंतर खऱ्या अर्थाने लोकमान्य ठरलेले नेते म्हणजे बाळासाहेब ठाकरे होते, असे राऊत म्हणाले. आज संध्याकाळी शिवसेनेतर्फे बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त षण्मुखानंद सभागृहात विशेष सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित राहणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

बाळासाहेबांनी महाराष्ट्राला आणि देशाला भक्कम एकजुटीचा विचार दिला. मराठी माणूस असो किंवा हिंदू समाज, एकजुटीची वज्रमूठ कोणत्याही संकटाचा सामना करू शकते, हे त्यांनी कृतीतून दाखवून दिले. सामान्यातील सामान्य माणसाला शूर आणि निर्भय बनवून त्याला त्याचे हक्क, न्याय आणि कर्तव्यांची जाणीव करून देण्याचे काम बाळासाहेबांनी केले, असे राऊत म्हणाले. महाराष्ट्राला बाळासाहेबांचे विस्मरण कधीच होणार नाही, असेही त्यांनी ठामपणे सांगितले.

भारतीय जनता पक्ष कोणत्याही परिस्थितीत महापौरपद सोडणार नाही, असे संजय राऊत म्हणाले. भाजप बाळासाहेबांचे फोटो केवळ राजकीय स्वार्थासाठी वापरतो. तसे नसते तर त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना फोडली नसती. ज्या बाळासाहेबांनी महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाचे अस्तित्व निर्माण करून दिले, त्याच बाळासाहेबांचा पक्ष फोडून शिवसेनेशी काडीमात्र संबंध नसलेल्या एका व्यक्तीच्या हाती देण्यात आला. बाळासाहेबांचा धनुष्यबाण तुम्ही नामर्दांच्या हातात दिला, असा घणाघातही त्यांनी केला. अशा भारतीय जनता पक्षाकडून काय अपेक्षा करायची, असा सवालही राऊत यांनी उपस्थित केला.

शिंदेंचा पाठिंबा कधीही घेतला जाणार नाही, असे स्पष्ट करत संजय राऊत म्हणाले की, शिवसेनेवर इतके वाईट दिवस आलेले नाहीत. सत्ता मिळाली नाही म्हणून आम्ही तडफडत नाही किंवा कळवळत नाही. मात्र भारतीय जनता पक्षाला सत्तेची राक्षसी हाव लागलेली आहे, हे स्पष्टपणे दिसत आहे. ज्या पद्धतीने निवडणुका लढवण्यात आल्या, जिंकण्यात आल्या आणि पैशाचा वापर करण्यात आला, तो बाळासाहेबांचा विचार नव्हता. असे राजकारण पाहून बाळासाहेब म्हणायचे की, यांच्यापेक्षा वेश्या परवडल्या. हे बाळासाहेबांचे शब्द असून त्याचे ध्वनिचित्रफितीत पुरावे उपलब्ध आहेत, असेही राऊत म्हणाले.

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील प्रकार देवेंद्र फडणवीसांना मान्य असतील, असे वाटत नाही, असे सांगत राऊत म्हणाले की, दावोसहून मुंबईत आल्यानंतर काही वेगळ्या घडामोडी घडू शकतात, असे आपण आधीच सांगितले होते. ज्यांना असे वाटत असेल की आपण फार मोठे कार्य केले आहे, त्यांनी हे लक्षात घ्यावे की मुख्यमंत्री हा राज्याचा प्रमुख असतो आणि सत्ता त्याच्याच हातात असते, असा इशाराही त्यांनी दिला.

Comments are closed.