भारतीय संघाची चिंता वाढणार? वर्ल्ड कपच्या तोंडावर स्टार खेळाडू दुखापतग्रस्त, सामन्याच्या मध्यातूनच बाहेर!

भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यातील टी-20 मालिकेतील दुसरा सामना रायपूरमध्ये खेळला जात आहे. टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) टॉस जिंकल्यानंतर न्यूझीलंडला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. न्यूझीलंडच्या टिम सीफर्ट आणि डेव्हॉन कॉनवे यांनी आक्रमक सुरुवात करत पहिल्या 3 षटकांतच 43 धावा केल्या. मात्र, त्यानंतर हर्षित राणा आणि वरुण चक्रवर्ती यांनी सलग दोन षटकांत या दोन्ही फलंदाजांना बाद करून पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.

सामन्यात रोमांच निर्माण झाला असतानाच, टीम इंडियासाठी मैदानातून एक वाईट बातमी समोर आली आहे. ईशान किशन (Ishaan kishan) क्षेत्ररक्षण (Fielding) करताना जखमी झाला असून त्याला मैदानाबाहेर जावे लागले आहे.

टी-20 वर्ल्ड कप 2026 सुरू होण्यापूर्वीच टीम इंडियासाठी एकामागून एक वाईट बातम्या येत आहेत. पहिल्या टी-20 सामन्यात अक्षर पटेल जखमी झाला होता, त्यामुळे तो रायपूरमधील दुसऱ्या सामन्यात खेळू शकलेला नाही. आता ईशान किशनही गंभीररित्या जखमी झाला आहे.

ईशानने वेगाने येणारा चेंडू डायव्ह मारून अडवण्याचा प्रयत्न केला, पण डाइव्ह मारताना त्याच्या शरीराचा पूर्ण भार हातांवर आला. ईशानला खूप त्रास जाणवू लागल्याने त्याला मैदान सोडून बाहेर जावे लागले.

वर्ल्ड कपच्या तोंडावर भारतीय संघाचे अनेक खेळाडू दुखापतग्रस्त झाले आहेत. तिलक वर्मा अजूनही दुखापतीतून सावरत आहे, तर वॉशिंग्टन सुंदर वर्ल्ड कपपर्यंत तंदुरुस्त होईल की नाही, याबाबत प्रश्नचिन्ह आहे. अक्षर पटेलच्या दुखापतीचे स्वरूप किती गंभीर आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. आता या जखमी खेळाडूंच्या यादीत ईशान किशनचेही नाव जोडले गेले आहे.

Comments are closed.