Jalna crime news – जालन्यात गावठी पिस्तुलातून गोळ्या झाडून तरुणाचा निर्घृण खून, पोलिसांनी दोन आरोपींच्या मुसक्या आवळल्या

जालन्यात गावठी पिस्तुलातून गोळ्या झाडून तरुणाचा निर्घृण खून करण्यात आला आहे. शुक्रवारी रात्री साडे आठच्या सुमारास जालना शहरातील नूतन वसाहत परिसरात असणाऱ्या जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या जवळील बारसमोर ही घटना घडली. चरण रायमल (वय – 27, रा. कैकाडी मोहल्ला, जालना) असे मृत तरुणाचे नाव आहे. यामुळे एकच खळबळ उडाली असून कदीम जालना पोलिसांनी वेगाने सूत्र हलवत या प्रकरणी दोन आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.

पोलीस अधीक्षक अजकुमार बन्सल यांनी दिलेल्या माहितीनुसार, चरण रायमलू हा काल चालक होता. सायंकाळी साडे आठच्या सुमारास तो दुचाकीवरून जिल्हा सामान्य रुग्णालयाजवळील रस्त्याने जात होता. याचवेळी दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी त्याच्यावर गावठी पिस्तुलातून तीन गोळ्या झाडल्या. गोळी थेट डोक्यात घुसल्याने चरण जागीच कोसळला.

घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव, कदीम ठाण्याचे पोलीस निरीक्षक जनार्धन शेवाळे हे कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी फॉरेन्सिक टीमच्या मदतीने घटनास्थळी सुरक्षित केले. त्यानंतर जखमीला तातडीने खासगी रुग्णालयात हलवले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. यानंतर पोलिसांनी संशयित आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना केली.

शुक्रवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास कदीम जालना पोलिसांच्या पथकाने अंबड रोडवरील काजळा फाटा परिसरात पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या दोन आरोपींचा पाठलाग जेरबंद केले आहे. अजय विजय आमलेकर, अमन शैलेंद्र धिल्लोड (दोघेही रा. मातोश्री लॉन नजीक, जालना) अशी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलीस निरीक्षक जनार्धन शेवाळे, पोलीस अंमलदार सदा राठोड, नंदकिशोर टेकाळे, शेख मतीन, आशपाक शाह यांच्यासह पथकाने वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली ही कामगिरी केली आहे. पोलीस हत्येच्या कारणाचा शोध घेत आहेत.

Comments are closed.