गुवाहाटीत भारताचा टी20 रेकॉर्ड चांगला? ऋतुराजने ठोकले होते ऑस्ट्रेलियाविरुद्ध नाबाद शतक

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात मालिकेतील तिसरा सामना आज (रविवार, २५ जानेवारी) खेळला जाणार आहे. पाच सामन्यांच्या या टी२० मालिकेत भारत २-० अशा आघाडीवर आहे. यामुळे तिसरा सामना जिंकत विजयाची हॅट्ट्रीक तसेच मालिका जिंकण्याचा प्रयत्न कर्णधार सूर्यकुमार यादव आणि सहकाऱ्यांचा असणार आहे. न्यूझीलंड मात्र भारताच्या या आशेवर पाणी फिरवण्याच्या प्रयत्नात असेल. त्यांचा हा प्रयत्न यशस्वी होऊ शकतो, कारण टी२०मध्ये भारताची गुवाहाटीत म्हणावी तशी चांगली कामगिरी झालेली नाही. तसे मागील काही सामन्यांमधून समोर आले आहे.

गुवाहाटीच्या बरसापरा क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाणारा हा सामना भारताच्या विजयाची एकप्रकारे अग्निपरिक्षा असणारच आहे. या स्टेडियमवर भारताने २०० धावसंख्या पार करण्याचा पराक्रम केला आहे, मात्र सर्वाधिक सामने जिंकणे अवघड दिसले आहे. येथे भारताने आतापर्यंत ४ सामने टी२० खेळले असून त्यातील केवळ एकच सामना यजमानांना जिंकता आला आहे. येथे भारताने दोन सामने गमावले आहेत, तर एका सामन्याचा निकाल लागला नाही.

या मैदानावर भारताचे दोन्ही पराभव ऑस्ट्रेलियाविरुद्ध आले असून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मात्र भारताला विजय मिळवण्यात यश आले आहे. तसेच श्रीलंकेविरुद्धचा सामना अनिर्णीत राहिला.

भारताने येथे २०२३मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी२० सामना खेळला होता. या सामन्यात भारताकडून ऋतुराज गायकवाडने शतक केले होते. त्याने ५७ चेंडूत १३ चौकार आणि ७ षटकारांच्या साहाय्याने नाबाद १२३ धावा केल्या होत्या. त्यामुळे भारताने २० षटकात ३ विकेट्स गमावत २२२ धावसंख्या उभारली होती. ऑस्ट्रेलियाकडून ग्लेन मॅक्सवेलनेही नाबाद शतक केले होते. हा सामना ऑस्ट्रेलियाने शेवटच्या चेंडूवर जिंकला होता. हा सामना भारताने ५ विकेट्सने गमावला.

तसेच २०१७मध्ये झालेल्या सामन्यातही भारत ऑस्ट्रेलियाविरुद्ध ८ विकेट्सने पराभूत झाला होता. त्या सामन्यात भारताचे फलंदाज वेगवान गोलंदाज जेसन बेहरनडॉर्फसमोर धावा करण्यात अपयशी ठरले होते. त्या सामन्यात भारताने सर्व विकेट्स गमावत २० षटकात ११८ धावसंख्या उभारली होती.

भारताच्या या मैदानावरील एकमेव विजयात केएल राहुलचे मोठे योगदान होते. त्याच्या आणि सूर्यकुमार यादवच्या स्फोटक फलंदाजीमुळे भारताने २० षटकात ३ विकेट्स गमावत २३७ धावसंख्या उभारली होती. त्यामध्ये राहुलने ५७ धावा (२८ चेंडू) आणि सूर्यकुमारने ६१ धावा (२२ चेंडू) केल्या होत्या. २०२२मध्ये खेळल्या गेलेल्या त्या सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा १६ धावांनी पराभव केला होता.

Comments are closed.