सहभागाचा पत्ता नाही, पण संघ तयार! वर्ल्ड कपबाबत पाकिस्तानचा अजब कारभार; निर्णयापूर्वीच संघ केला जाहीर
पाकिस्तान आणि अतरंगी घडामोडी यांचे नाते जुने आहे. बांगलादेशने टी20 वर्ल्डकपमधून माघार घेतल्याप्रकरणी पाठिंबा म्हणून पाकिस्तान क्रिकेट बोर्डही स्पर्धेवर बहिष्कार टाकण्याच्या विचारात आहे. पडद्यामागे पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आणि सरकार यांच्यात यासंदर्भात बोलणी सुरू असताना पाकिस्तानने स्पर्धेसाठी संघ जाहीर केला आहे.
वर्ल्डकपसाठी तयारी म्हणून पाकिस्तानचा संघ मायदेशात ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी20 मालिका खेळणार आहे. त्या मालिकेसाठी जाहीर संघाशी मिळताजुळता असा संघच पाकिस्तानने जाहीर केला आहे.
निवडसमिती म्हणून आमचं काम संघ निवडणं आहे आहे. आयसीसीने वर्ल्डकपसाठी संघनिवडीकरता निर्धारित तारीख दिली आहे. त्यानुसार आम्ही संघाची घोषणा केली. वर्ल्डकपमध्ये खेळायचं की नाही याचा निर्णय सरकार घेईल. मी त्यासंदर्भात काही बोलू शकत नाही असं पाकिस्तानचे मुख्य प्रशिक्षक आकिब जावेद यांनी सांगितलं.
सलमान अघाकडेच नेतृत्वाची धुरा कायम राखण्यात आली आहे. टी20 प्रकारात कमीत कमी चेंडूत जास्तीत जास्त धावा फटकावणे हे अत्यावश्यक मानलं जातं. स्ट्राईकरेट तगडा असणं फलंदाजांसाठी गरजेचं असतं. प्रदीर्घ काळ टी20 प्रकारात संथ स्ट्राईकरेटने खेळण्यावरून माजी कर्णधार बाबर आझमवर टीका करण्यात आली. ऑस्ट्रेलियात बिग बॅश स्पर्धेतही बाबरला लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही. टी20 प्रकारात कामगिरी सर्वसाधारण असतानाही बाबरला या संघात स्थान मिळालं आहे. बाबर आणि त्याचा सहकारी मोहम्मद रिझवान यांना टी20 संघातून डच्चू देण्यात आला होता. बाबरचं पुनरागमन झालं असलं तरी रिझवानला राष्ट्रीय संघात खेळण्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. ख्वाजा नफाय आणि साहिबजादा फरहान यष्टीरक्षणाची जबाबदारी सांभाळतील.
अनुभवी फखर झमानकडून पाकिस्तानला मोठ्या खेळीची अपेक्षा असेल. कामगिरीत सातत्य नसतानाही सईम अय्युबने संघात स्थान कायम राखलं आहे. अष्टपैलू फहीम अशरफमुळे संघाला संतुलन मिळालं आहे.
बिग बॅश लीग स्पर्धेत सर्वाधिक विकेट्स पटकावणाऱ्या हॅरिस रौफची या संघात निवड होऊ शकलेली नाही. शाहीन शहा आफ्रिदी गोलंदाजी आक्रमणाचा प्रमुख असेल. सलमान मिर्झा आणि नसीम शहा त्याचे सहकारी असतील. शदाब खान, मोहम्मद नवाझ, अबरार अहमद आणि उस्मान तारीक ही चौकडी फिरकी आक्रमण सांभाळेल.
पाकिस्तान संघाने वर्ल्डकप खेळायचं ठरवल्यास त्यांचा पहिला सामना 7 फेब्रुवारीला कोलंबो इथे नेदरलँड्सविरुद्ध होणार आहे. अ गटात पाकिस्तानसह भारत, अमेरिका, नेदरलँड्स आणि नामिबिया यांचा समावेश आहे. भारत-पाकिस्तान सामना 15 फेब्रुवारीला कोलंबो इथे होणार आहे.
2007 मध्ये पहिल्यावहिल्या टी20 वर्ल्डकप स्पर्धेत पाकिस्तानने अंतिम फेरीत धडक मारली होती. मात्र भारताने थरारक विजय मिळवला होता. त्यानंतर दोन वर्षांनी पाकिस्तानने जेतेपदाची कमाई केली होती. त्यानंतर 17 वर्ष टी20 वर्ल्डकपच्या जेतेपदाने पाकिस्तानला दुरावलं आहे.
Comments are closed.