संस्कृतायन – हल्ल्याची वाट पाहत आहात?

>> डॉ समीरा गुजर जोशी
वरवर दिसणारी राजकीय निक्रियता ही राजनैतिक योजना असू शकते या युधिष्ठिराने पांडवांना केलेल्या उपदेशातून भारवीने राजनैतिक चर्चा घडविली आहे. आजही कालसुसंगत वाटतील असे विचार मांडणारे किरातार्जुनीयमधील या सर्गांमधून भारवीचे सारे बुद्धिचातुर्य दिसते.
महाकवी भारवीच्या ‘किरातार्जुनीय’चा परिचय आपण करून घेत आहोत. त्या मालिकेतील हा शेवटचा लेख. आधी आपण मागील लेखात पाहिले त्याप्रमाणे युधिष्ठिराने द्रौपदी आणि भीमाच्या म्हणण्याला काय उत्तर दिले ते पाहू. खरे तर एखाद्या चित्रपटात ज्याप्रमाणे कोर्ट रूम ड्रामा रंगलेला असतो. एका पक्षाच्या वकिलाने आपले म्हणणे इतके छान मांडले आहे की, केसचा निकाल स्पष्ट आहे असेच सगळ्यांना वाटते आहे आणि अशा वेळी दुसऱया पक्षाचा वकील बोलणार तरी काय? असे वाटत असताना तो बाजी फिरवतो तसे काही युधिष्ठिराच्या बाबतीत होते. तो क्षमा आणि संयम यांचे महत्त्व सांगतो आहे. एरवीसुद्धा हे विषय पटायला थोडे अवघड आहेत.
पांडवांवरील अन्याय हा इतका स्पष्ट आहे की, अशा वेळी तर ही मूल्ये स्वीकारणे कोणालाही बुळबुळीत धोरणाचे लक्षण वाटावे, पण युधिष्ठिराने मुद्देसूदपणे आपले म्हणणे मांडले आहे. दुर्योधनाचा तात्पुरता उत्कर्ष पाहून तुम्ही का डळमळीत होत आहात? जो मुळात संयमी नाही अशा राजाकडे चंचल लक्ष्मी टिकत नाही. तुम्हाला ही भीती वाटत असेल की, आपण नसताना आपले मित्र दुर्योधन स्वतकडे खेचून घेईल तर यादवांसारखे मित्र आपला पक्ष सोडून कधीही जाणार नाहीत. एवढेच नव्हे तर यादवांचे जे सहज मित्र आहेत तेही आपल्याला सोडून जाणार नाहीत. आता ते दुर्योधनाशी नम्रतेने वागत असले तरी मोक्याच्या क्षणी त्यांची साथ आपल्याला मिळणार आहे. वरवर दिसणारी राजकीय निक्रियता ही राजनैतिक योजना असू शकते याची कल्पना इथे येते. पुढे युधिष्ठिराने हेही स्पष्ट केले की, आपण सध्या वनवासाच्या अटींनी बांधले गेलो आहोत, पण त्या अटींचे पालन करणे केवळ नैतिकदृष्टय़ा बंधनकारक नाही, तर आपल्या मित्रपक्षांच्या अपेक्षेप्रमाणेही आपल्याला तसेच वागायला हवे. आपण सर्व अटींचे पालन केले तर उद्या मित्रपक्ष आपल्या बाजूने उभे राहतील. आज जर आपण वनवासात असताना अटींचे उल्लंघन केले तर दुर्योधनाचा पक्ष बळकट होईलच, पण आपण आपल्या मित्रांनाही अडचणीत आणू. अशा वेळी त्यांना उघडपणे आपल्या बाजूने उभे राहणेही शक्य होणार नाही.
दुर्योधनासारखा प्रतिपक्षी जो मुळात अहंकारी आहे तो स्वतच्या मित्रांनाही दीर्घकाळ सांभाळू शकेल असे नाही. अपमान करणे हा त्याचा गुणधर्म आहे. आपल्या अनुपस्थितीत तो ज्यांना अपमानित करेल आपण त्याकडे लक्ष ठेवून आहोत. पुढे तेही आपल्याला मित्र म्हणून सामील होतील. त्याचे सचिवसुद्धा परस्परांविषयी असूया धरणारे आहेत. उद्या त्यांनाही आपण फोडू. आता कोणी म्हणेल की, या नुसत्या पोकळ बाता आहेत तर तसे नक्कीच नाही. वनवासात असतानाही आपली हेर यंत्रणा त्याने सक्रिय ठेवली आहे. प्रत्येक वेळी युद्ध म्हणजे ‘अटॅक’ नसतो. आक्रमण हाच दरवेळी उपाय नसतो. हुशारीने संयम दाखवणे, मौन पाळणे, अविवेकी शत्रूच्या विजयाची उपेक्षा करणे हेही राजकीय धोरण असू शकते. किंबहुना असते.
अलीकडच्या काळातील काही घटनांच्या संदर्भात या धोरणाचा वापर भारताने केला आहे असेही म्हणता येईल. अर्थात वनवासात पांडव बेफिकीर अजिबात नव्हते हे यावरून दिसते, पण सोबतीने त्यांनी आपले सामर्थ्य वाढवावे म्हणून त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी साक्षात वेद व्यास येतात. त्यांच्या सल्ल्यानुसार अर्जुन पाशुपत अस्त्राच्या प्राप्तीसाठी जातो असा पुढील कथाभाग आहे. म्हणजे केवळ दूत येणे या एका घटनेभोवती तीन सर्गांची रचना करून भारवीने राजनैतिक चर्चा घडविली आहे. आजही कालसुसंगत वाटतील असे विचार मांडले आहेत. त्याची निसर्ग वर्णने अद्भुत आहेत, त्याने व्यक्तिरेखा फार सुंदर रेखाटल्या आहेत हे खरे आणि त्याविषयी खूप बोलण्यासारखे आहे, ज्याविषयी लेखाच्या मर्यादेत आपण बोललो नाही, पण भारवीचे सारे बुद्धिचातुर्य या सर्गांमधून दिसते. असा ठेवा संस्कृत साहित्याने आपल्याला दिला आहे हे आपले सांस्कृतिक वैभव म्हणायला हवे.
(लेखिका निवेदिका, अभिनेत्री आणि
संस्कृत – मराठी साहित्य हे याचे लेखक आहेत.)

Comments are closed.