रोहित, हरमनप्रीतसह 9 खेळाडूंचा ‘पद्म’ पुरस्कारांनी सन्मान! दिग्गज टेनिसपटू विजय अमृतराज यांना ‘पद्मभूषण’ जाहीर
भारतीय महिला संघाला पहिलेवहिले विश्वविजेतेपद मिळवून देणारी हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) आणि 2024 मध्ये पुरुष संघाला टी-20 विश्वविजेता बनवणारा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) यांना ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला सरकारने या पुरस्कारांची घोषणा केली. टेनिस दिग्गज विजय अमृतराज यांना यावर्षीचा ‘पद्मभूषण’ हा क्रीडा क्षेत्रातील एकमेव सन्मान मिळाला आहे.
पद्म पुरस्कार हे देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कारांपैकी एक असून ते तीन श्रेणींमध्ये दिले जातात: पद्म विभूषण (असाधारण सेवा), पद्म भूषण (उच्च दर्जाची विशिष्ट सेवा) आणि पद्म श्री (विशिष्ट सेवा). कला, समाजसेवा, विज्ञान, खेळ अशा विविध क्षेत्रांतील योगदानासाठी दरवर्षी प्रजासत्ताक दिनी या पुरस्कारांची घोषणा केली जाते.
विजय अमृतराज (पद्म भूषण): भारतीय टेनिसला जागतिक ओळख मिळवून देणारे विजय अमृतराज हे दिग्गज खेळाडू आहेत. विम्बल्डन आणि यूएस ओपनच्या उपांत्यपूर्व फेरीपर्यंत त्यांनी मजल मारली होती.
हरमनप्रीत कौर (पद्म श्री): हरमनप्रीत कौर भारताच्या महिला वनडे विश्वचषक विजेत्या संघाची यशस्वी कर्णधार आहे. तिने महिला क्रिकेटमधील जेतेपदाचा दुष्काळ संपवण्यात मोठी भूमिका बजावली आहे.
रोहित शर्मा (पद्म श्री): 2024 टी-20 विश्वचषक आणि 2025 चॅम्पियन्स ट्रॉफी विजेता कर्णधार आहे. त्याने भारतीय क्रिकेटला नव्या उंचीवर नेले आहे.
व्लादिमीर मेस्तविरिशविली (पद्म श्री – मरणोत्तर): जॉर्जियाई कुश्ती प्रशिक्षक, ज्यांनी सुशील कुमार, योगेश्वर दत्त यांसारखे ऑलिम्पिक पदक विजेते घडवले.
बलदेव सिंह (पद्म श्री): महिला हॉकीची ‘नर्सरी’ म्हणून ओळखले जाणारे द्रोणाचार्य पुरस्कार विजेते प्रशिक्षक. राणी रामपालसह अनेक आंतरराष्ट्रीय खेळाडू तयार केले.
भगवानदास रायकवार (पद्म श्री): 83 वर्षीय रायकवार यांनी बुंदेलखंडची पारंपरिक ‘बुंदेली युद्ध कला’ (अखाडा संस्कृती) जिवंत ठेवण्यासाठी आयुष्य वेचले.
प्रवीण कुमार (पद्म श्री): पॅरिस पॅरालिम्पिक 2024 मधील उंच उडीतील सुवर्णपदक विजेता. भारतासाठी पॅरालिम्पिकमध्ये इतिहास रचणारा खेळाडू.
सविता पुनिया (पद्म श्री): भारतीय महिला हॉकी संघाची भिंत आणि गोलकीपर. आशिया चषक आणि ऑलिम्पिकमधील ऐतिहासिक कामगिरीत महत्त्वाचे योगदान.
के. पजानिवेल (पद्म श्री): पुडुचेरीच्या या तज्ज्ञाने गेल्या 40 वर्षांपासून ‘सिलंबम’ (प्राचीन तमिळ मार्शल आर्ट्स) या युद्धकलेचे संरक्षण आणि प्रचार केला आहे.
Comments are closed.