भारताने वेस्ट इंडिजचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडीत काढला, 60 चेंडू शिल्लक ठेवत रचला नवा इतिहास

भारताने रविवारी गुवाहाटी येथे झालेल्या तिसऱ्या टी20 सामन्यात न्यूझीलंडचा 8 विकेट्सनी दणदणीत पराभव करत पाच सामन्यांची मालिका खिशात घातली. या विजयासह टीम इंडियाने मालिकेत 3-0 अशी अजेय आघाडी घेतली असून, टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक ऐतिहासिक विक्रमही आपल्या नावावर केला आहे.

न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करत 20 षटकांत 9 विकेट्स गमावत 153 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताने अवघ्या 10 षटकांतच 154 धावांचे लक्ष्य गाठत सामना संपवला. 150 पेक्षा अधिक धावांचा पाठलाग करताना कोणत्याही ‘फुल मेंबर’ संघाने इतक्या चेंडू शिल्लक ठेवत मिळवलेला हा सर्वात मोठा विजय ठरला. भारताने यासह वेस्ट इंडिजचा 2024 मधील विक्रम मोडीत काढला.

भारताची सुरुवात मात्र खराब झाली. डावाच्या पहिल्याच चेंडूवर संजू सॅमसन बाद झाला. त्यानंतर ईशान किशन आणि अभिषेक शर्मा यांनी आक्रमक फलंदाजी करत संघाला सावरले. दुसऱ्या विकेटसाठी दोघांमध्ये 53 धावांची भागीदारी झाली. ईशान किशन 13 चेंडूत 28 धावा करून बाद झाला. मात्र, त्यानंतर अभिषेक शर्मा आणि कर्णधार सूर्यकुमार यादव यांनी न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर अक्षरशः हल्लाबोल केला.

अभिषेक शर्माने केवळ 14 चेंडूत अर्धशतक पूर्ण करत भारतासाठी दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात वेगवान अर्धशतकाचा विक्रम केला. त्याने 20 चेंडूत 7 चौकार आणि 5 षटकारांसह नाबाद 68 धावा केल्या. सूर्यकुमार यादवनेही दमदार फलंदाजी करत 26 चेंडूत 57 धावा ठोकल्या. भारताने 10 षटकांत 2 विकेट्सवर 155 धावा करत सामना जिंकला.

याआधी भारताच्या गोलंदाजांनी न्यूझीलंडला मर्यादित धावसंख्येवर रोखण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. जसप्रीत बुमराहने 3 विकेट्स घेतल्या, तर रवि बिश्नोई आणि हार्दिक पांड्याने प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या. हर्षित राणानेही एक विकेट घेतली. न्यूझीलंडकडून ग्लेन फिलिप्सने सर्वाधिक 48 धावांची झुंजार खेळी केली.

Comments are closed.