भारत विरुद्ध न्यूझीलंड चौथा टी-20 सामना कधी, कुठे आणि कसा पाहायचा? जाणून घ्या सविस्तर माहिती

भारत आणि न्यूझीलंड दरम्यान 5 सामन्यांची टी-20 मालिका खेळली जात आहे. मालिकेतील चौथा सामना 28 जानेवारीला विशाखापट्टनम येथे खेळवला जाईल. भारतीय संघाने आधीच ही मालिका 3-0 ने आपल्या नावे केली आहे. भारत आणि न्यूझीलंडमधील या सामन्याच्या थेट प्रक्षेपणाचा आनंद चाहते विनामूल्य घेऊ शकतात.

​भारत आणि न्यूझीलंडमधील चौथा टी-20 सामना बुधवार, (28 जानेवारी 2026) रोजी विशाखापट्टनमच्या ACA-VDCA क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल. भारतीय वेळेनुसार टॉस (फेक) संध्याकाळी 6:30 वाजता होईल, तर सामन्याला 7 वाजता सुरुवात होईल.

​भारतात या सामन्याचे थेट प्रक्षेपण ‘स्टार स्पोर्ट्स नेटवर्क’वर केले जाईल, तर सामन्याची लाईव्ह स्ट्रीमिंग ‘जियोहॉटस्टार’ (JioHotstar) ॲप आणि वेबसाइटवर उपलब्ध असेल. याशिवाय, हा सामना ‘डीडी स्पोर्ट्स’ नेटवर्कवर विनामूल्य पाहता येईल.

​चौथ्या टी-20 सामन्यात जसप्रीत बुमराहला विश्रांती दिली जाऊ शकते. बुमराहचा वर्कलोड आणि आगामी टी-20 वर्ल्ड कप 2026 लक्षात घेता, ‘जस्सी’च्या जागी अर्शदीप सिंगला संधी मिळण्याची शक्यता आहे. या व्यतिरिक्त भारतीय संघात बदल होण्याची शक्यता कमी आहे.

​संजू सॅमसनचा फॉर्म भारतीय संघासाठी चिंतेचा विषय ठरत आहे. न्यूझीलंडविरुद्ध आतापर्यंत झालेल्या 3 सामन्यात तो फ्लॉप ठरला आहे. पहिल्या सामन्यात 10, दुसऱ्या सामन्यात 6 आणि तिसऱ्या सामन्यात तो ‘गोल्डन डक’वर (पहिल्याच चेंडूवर) बाद झाला. टी-20 वर्ल्ड कप 2026 पूर्वी संजूला फॉर्ममध्ये परतावे लागेल, अन्यथा टीम इंडियाला याचे नुकसान सोसावे लागू शकते.

Comments are closed.