क्रिकेटपटूंना कुटुंबासोबत राहण्यास मनाई! ‘बीसीसीआय’ने संघ व्यवस्थापनाची मागणी फेटाळली

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

टी-20 क्रिकेट वर्ल्ड कप दरम्यान हिंदुस्थानी क्रिकेटपटूंना आपल्या कुटुंबीयांसोबत (पत्नी व साखरपुडा झालेल्या जोडीदारांसह) संघाच्या हॉटेलमध्ये राहता येणार नाही. संघ व्यवस्थापनाने खेळाडूंच्या पत्नी व मंगेतर यांना संघासोबत हॉटेलमध्ये थांबण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी हिंदुस्थान क्रिकेट नियामक मंडळाकडे (बीसीसीआय) केली होती. मात्र ती बीसीसीआयने स्पष्टपणे फेटाळून लावली आहे.

इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, बीसीसीआयने स्पष्ट केले आहे की, स्पर्धे दरम्यान खेळाडूंच्या कुटुंबीयांना संघासोबत राहण्याची परवानगी नाही. मात्र एखाद्या खेळाडूला हवे असल्यास तो आपल्या कुटुंबीयांसाठी हॉटेलमध्ये स्वतंत्र व्यवस्था स्वतःच्या खर्चाने करू शकतो. संपूर्ण स्पर्धेदरम्यान संघ खासगी चार्टर विमानाने प्रवास करणार आहे. खेळाडूंसाठी वैयक्तिक स्वयंपाकीही आहेत. मात्र त्यांनी जवळच्या हॉटेलमध्ये व्यवस्था करून तिथे अन्न तयार करून संघाला पाठवण्याची सोय केली आहे.

हिंदुस्थान हा टी-20 वर्ल्ड कपचा सहयजमान आहे. पाकिस्तानविरुद्धच्या एका सामन्यासाठीच संघाला श्रीलंकेला जावे लागणार असल्याने खेळाडूंना कुटुंबासोबत राहण्याची गरज नाही, असे बीसीसीआयचे म्हणणे आहे. दरम्यान, टीम इंडिया टी-20 वर्ल्ड कपमधील पुढील सामन्यात 12 फेब्रुवारीला नवी दिल्लीत अरुण जेटली स्टेडियमवर नामिबियाशी भिडणार आहे. त्यानंतर 15 फेब्रुवारीला कोलंबोत कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध बहुचर्चित सामना खेळवला जाणार आहे. बीसीसीआयने सर्व खेळाडूंना जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोर पालन करण्याचे आदेश दिले आहेत. नियमांचे उल्लंघन झाल्यास शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे. कोणत्याही कारणास्तव एखाद्या खेळाडूला या नियमांपासून सूट हवी असल्यास त्याने निवड समितीचे अध्यक्ष आणि मुख्य प्रशिक्षक यांची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे.

बॉर्डर-गावसकर ट्रॉफीनंतर नियमांत बदल

सध्याच्या नियमानुसार, एखादा परदेश दौरा 45 दिवसांपेक्षा जास्त कालावधीचा असेल, तर कुटुंबीयांना कमाल 14 दिवस खेळाडूसोबत राहण्याची परवानगी आहे. मात्र हा नियम आयसीसी किंवा बहुराष्ट्रीय स्पर्धांवर लागू होत नाही. ऑस्ट्रेलियाविरुद्ध बॉर्डर-गावसकर ट्रॉफी (बीजीटी) 2024-25मध्ये हिंदुस्थानला 1-3ने पराभव पत्करावा लागला. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या पराभवानंतर सहाय्यक कर्मचाऱ्यांनी काही खेळाडू अंतर्गत बैठकांना व नियोजन सत्रांना अनुपस्थित राहत असल्याची बाब ‘बीसीसीआय’च्या निदर्शनास आणली. यानंतर बीसीसीआयने जानेवारी 2025मध्ये तडकाफडकी नवीन नियम जाहीर केले.

Comments are closed.