ग्रीससह संरक्षण सहकार्यासाठी 5 वर्षांचा रोडमॅप

ग्रीसचे संरक्षणमंत्री भारताच्या दौऱ्यावर : संरक्षण सहकार्य होणार मजबूत

► वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

ग्रीसचे संरक्षणमंत्री निकोस डेंडियास सध्या भारताच्या दौऱ्यावर असून त्यांनी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेत भारतीय संरक्षण उत्पादनांची पाहणी केली आहे. डेंडियास यांच्या या दौऱ्यात भारत आणि ग्रीसने संरक्षण उद्योग सहकार्याला मजबूत करण्यासाठी एका संयुक्त घोषणापत्रावर स्वाक्षरी करत 5 वर्षांचा रोडमॅप आखण्याचा निर्णय घेतला आहे.

राजनाथ सिंह यांनी ग्रीसचे संरक्षणमंत्री डेंडियास यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक घेतली असून यात भारत-ग्रीस धोरणात्मक भागीदारी शांतता, स्थिरता, स्वातंत्र्य आणि परस्पर सन्मानाच्या संयुक्त मूल्यांवर आधारित असल्याचा पुनरुच्चार करण्यात आला आहे. यादरम्यान दोन्ही संरक्षणमंत्र्यांनी संयुक्त घोषणापत्रावर स्वाक्षरी केली आहे. याच्या आधारावर पुढील 5 वर्षांचा रोडमॅप तयार केला जाणार आहे.

हे घोषणापत्र दोन्ही देशांच्या संरक्षण उद्योग सहकार्याला मजबुती प्रदान करणार आहे. भारताचा ‘आत्मनिर्भर भारत’ पुढाकार अणि ग्रीसचा ‘अजेंडा-2030 संरक्षण सुधार योजनेला जोडून दोन्ही देश स्वत:च्या स्वदेशी संरक्षण उद्योगाला आणखी मजबूत करतील असे बैठकीत निश्चित करण्यात आले. दोन्ही संरक्षणमंत्र्यांनी क्षेत्रीय शांतता आणि सुरक्षेशी निगडित मुद्द्यांवरही चर्चा केली. द्विपक्षीय संरक्षण सहकार्य आणि रणनीतिक संबंध सातत्याने दृढ होत असल्याचे दोन्ही देशांनी मान्य केले आहे.

तसेच 2026 साठी द्विपक्षीय सैन्य सहकार्य योजनेचे आदान-प्रदानही करण्यात आले, ज्यामुळे दोन्ही देशांच्या सैन्यांदरम्यान होणाऱ्या कार्यक्रमांची रुपरेषा निश्चित होणार आहे. गुरुग्राम येथील इन्फॉर्मेशन फ्यूजन सेंटर-इंडियन ओशन रिजमध्ये स्वत:चा एक आंतरराष्ट्रीय संपर्क अधिकारी तैनात करण्याची घोषणा ग्रीसने केली आहे.

ग्रीसच्या शिष्टमंडळाने प्रमुख संरक्षण आणि औद्योगिक संस्थांचाही दौरा केला आहे. शिष्टमंडळाने संरक्षण क्षेत्रातील सार्वजनिक उपक्रम, संरक्षण उद्योग आणि स्टर्टअप प्रतिनिधींशी चर्चा केली आहे.

Comments are closed.