नरवणे यांचे पुस्तक अप्रकाशित राहिले आहे

पेंग्विन कंपनीकडून आणखी एकदा स्पष्टीकरण

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

भारताच्या भूसेनेचे माजी प्रमुख मनोज नरवणे यांनी लिहिलेले, पण अद्याप प्रकाशित न झालेले पुस्तक सध्या वादग्रस्त ठरले आहे. भारत आणि चीन यांच्यात लडाख येथे दोन वर्षांपूर्वी जो संघर्ष झाला होता, त्यासंबंधात या पुस्तकात काही वादग्रस्त टिप्पणी आहे, असा आरोप आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी या पुस्तकाचा उल्लेख करून लोकसभेत केंद्र सरकारवर काही आरोप करण्याचा प्रयत्न केला होता. तथापि, नियमांचा आधार घेऊन लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी त्यांना बोलू दिले नव्हते. हे पुस्तक विदेशात प्रकाशित झालेले आहे, असे राहुल गांधी यांचे म्हणणे होते. तथापि, या पुस्तकाचे प्रकाशन अद्याप झालेलेच नाही, असे स्पष्टीकरण पेंग्विन या प्रकाशन कंपनीने केले आहे. त्यामुळे गूढ वाढले आहे.

कोणतेही पुस्तक जेव्हा विक्रीसाठी बाजारात उपलब्ध होते, तेव्हाच ते प्रकाशित झाले, असे मानले जाते, असे या कंपनीने निदर्शनास आणून दिले आहे एखाद्या पुस्तकाच्या नावाची किंवा मथळ्याची केवळ घोषणा करण्यात आली आणि त्याची मागणीपूर्व नोंदणी (प्री-ऑर्डर लिस्टिंग) करण्यात आली याचा अर्थ ते प्रकाशित झाले, असे म्हणता येत नाही. निवृत्त जनरल नरवणे यांचे पुस्तक अद्याप प्रकाशित झालेले नाही. कारण त्याची कोणतीही प्रत बाजारात उपलब्ध नाही. कोणीही या संदर्भात भ्रम पसरविण्याचा प्रयत्न करू नये, असे प्रतिपादन कंपनीने केले आहे.

राहुल गांधी यांच्याकडे प्रत कशी

राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वी संसदेच्या बाहेर या पुस्तकाचे मुखपृष्ठ असलेली एक तथाकथित प्रतही दाखविली होती. तसेच, हे पुस्तक त्यांना कोणी दिले, या प्रश्नाचे उत्तर टाळले होते. हे पुस्तक विदेशात उपलब्ध आहे, असा त्यांचा दावा होता. तथापि, त्यानंतर त्वरित या पुस्तकाचे प्रकाशन करणार असणाऱ्या पेंग्विन कंपनीने प्रथम स्पष्टीकरण केले होते आणि गांधी यांचा दावा खोडला होता. आता कंपनीकडून मंगळवारी या संदर्भात आणखी स्पष्टीकरण देण्यात आले आहे. त्यामुळे राहुल गांधी यांनी जी प्रत दाखविली, तिच्याविषयी संभ्रम निर्माण झाला.

नरवणे यांच्या पोस्टचा आधार

राहुल गांधी यांनी नरवणे यांच्या एका सोशल मीडिया पोस्टचा आधार घेत हे पुस्तक प्रकाशित झाले आहे, असा दावा केला. नरवणे यांच्या या पोस्टमध्ये ‘पुस्तक उपलब्ध आहे’ असा मजकूर असल्याचे राहुल गांधी यांचे म्हणणे आहे. मात्र, कंपनीच्या प्रतिपादनानुसार पुस्तक बाजारात उपलब्ध नाही. परिणामी, एका नव्या वादाला आता तोंड फुटण्याची शक्यता आहे. कंपनी खोटे बोलत असेल, असा आरोप गांधी यांनी केला असून आपला नरवणे यांच्यावर विश्वास अधिक आहे. त्यामुळे पुस्तकासंबंधी विधान केले, असेही राहुल गांधी यांचे म्हणणे आहे.

सर्व अधिकार आपल्याकडेच

या पुस्तकाच्या प्रकाशनाचे सर्व अधिकार केवळ आपल्या कंपनीकडे आहेत. अन्य कोणतीही कंपनी कोठेही हे पुस्तक प्रकाशित करू शकत नाही, असेही स्पष्टीकरण पेंग्विन कंपनीने केले आहे. या पुस्तकाची कोणतीही कागदी अगर डिजिटल प्रत बाजारात उपलब्ध नाही, असेही कंपनीचे म्हणणे आहे. त्यामुळे  पुस्तक विदेशात उपलब्ध आहे, या गांधीच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह लागले आहे.

भाजपची गांधी यांच्यावर टीका

कंपनीने दिलेल्या स्पष्टीकरणानंतर भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी राहुल गांधी यांच्यावर हल्लाबोल केला. गांधी हे साऱ्या देशासाठी अडचणीचा विषय बनले आहेत. नरवणे यांच्या पुस्तकाच्या प्रकाशनासंदर्भात त्यांनी धादांत खोटा प्रचार चालविला आहे, हे प्रकाशन कंपनीच्या स्पष्टीकरणातून दिसून येते. गांधी यांनी देशाची दिशाभूल केली. त्यांनी राजनाथसिंग यांच्या विरोधात अपप्रचार केला, असे गंभीर प्रत्यारोप शहजाद पूनावाला यांनी मंगळवारी केले.

अधिकच वाढले पुस्तकाचे गूढ

ड पेंग्विन कंपनीच्या नव्या स्पष्टीकरणामुळे पुस्तकासंबंधी वाद अधिक गडद

ड राहुल गांधी यांनी दाखविलेल्या पुस्तकाच्या प्रतीसंबंधी आता मोठे वादंग

ड या पुस्तकाच्या प्रकाशनाचे संपूर्ण अधिकार पेंग्विनकडेच असल्याचे स्पष्ट

ड राहुल गांधी खोटेपणा करत असल्याचा भारतीय जनता पक्षाचा आरोप

Comments are closed.