रशियात हिंदुस्थानींचा द्वेष वाढला; वर्षभरात 200 जीवघेणे हल्ले
हिंदुस्थानी लोकांना इतर राष्ट्रांत खालच्या दर्जाची वागणूक मिळत असून यात रशिया आघाडीवर असल्याचे समोर आले आहे. मागील वर्षभरात जगात हिंदुस्थानींवर झालेल्या 350 हल्ल्यांपैकी सर्वाधिक 200 हल्ले रशियात झाले आहेत. यामध्ये जीवघेण्या हल्ल्यांचाही समावेश आहे. जगातील 196 देशांत हिंदुस्थानींना वंशभेद, छळ आणि शोषणाच्या घटना समोर येत आहेत.
परराष्ट्र मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार जगभरातील हिंदुस्थानी विद्यार्थ्यांनी केलेल्या शोषण आणि वांशिक भेदभावाच्या तक्रारींपैकी अर्ध्याहून अधिक प्रकरणे रशियातील आहेत. आकडेवारीनुसार, 2025 साली 196 देशांमध्ये शिकणाऱया हिंदुस्थानी विद्यार्थ्यांनी शोषण, छळ आणि वांशिक भेदभावाशी संबंधित सुमारे 350 तक्रारी दाखल केल्या. यापैकी 200 हून अधिक तक्रारी केवळ रशियातून आल्या. गेल्या तीन वर्षांत या प्रकरणांमध्ये वेगाने वाढ झाली आहे. 2023 साली अशा 68 तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या. 2024 मध्ये ही संख्या वाढून 78 झाली आणि 2025 मध्ये वाढून 201 पर्यंत पोहोचली. रशियातील एका विद्यापीठाच्या वसतिगृहात 7 फेब्रुवारी रोजी झालेल्या चाकूहल्ल्यात चार हिंदुस्थानी विद्यार्थी जखमी झाल्यानंतर शिकणाऱया हिंदुस्थानी विद्यार्थ्यांच्या समस्या पुन्हा चर्चेत आल्या आहेत.
रशियाला जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 50 टक्के घटली
जगभरात परिस्थिती बिघडल्यामुळे आता अनेक हिंदुस्थानी विद्यार्थी रशियाऐवजी कझाकस्तान आणि किर्गिस्तानसारख्या देशांमध्ये शिक्षण घेणे अधिक सुरक्षित मानत आहेत. गेल्या काही वर्षांत रशियाला जाणाऱया हिंदुस्थानी विद्यार्थ्यांची संख्या 50 टक्क्यांनी घटली आहे.
Comments are closed.