नरवणे पेंग्विनचे ​​समर्थन करतात

पुस्तक प्रकाशन झाले नसल्याचे महत्त्वाचे प्रतिपादन

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

भारताचे माजी भूसेना प्रमुख मनोज मुकुंद नरवणे यांनी लिहिलेल्या, पण अद्याप प्रकाशित न झालेल्या पुस्तकासंबंधी मोठा वाद निर्माण झाला आहे. या पुस्तकाचे प्रकाशन झालेले नाही, असे प्रकाशक कंपनी पेंग्विनचे म्हणणे आहे. तर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी या पुस्तकाची प्रतच काही दिवसांपूर्वी दाखविली होती. जे पुस्तक प्रकाशित झालेले नाही, त्याची प्रत गांधी यांच्याजवळ कोठून आली, असा प्रश्न आता निर्माण झाला असून या पुस्तकासंबंधीचे गूढ त्यामुळे वाढले आहे.

या पुस्तकाच्या प्रकाशानाचे सर्वाधिकार असणाऱ्या पेंग्विन या कंपनीने यासंबंधी स्पष्टीकरण दिले असून पुस्तकाचे प्रकाशन अद्याप झालेलेच नाही, ही बाब घोषित केली आहे. त्यानंतर, आता प्रत्यक्ष नरवणे यांनीच प्रकाशक कंपनीच्या प्रतिपादनाला दुजोरा दिला असून पुस्तकाचे अद्याप प्रकाशन झाले नसून ते बाजारात कोणत्याही स्वरुपात उपलब्ध नाही, हे सोशल मिडियावरील संदेशात स्पष्ट केले.

नियतीचे चार तारे

नरवणे यांच्या या अप्रकाशित पुस्तकाचे नाव ‘फोर स्टार्स ऑन डेस्टिनी’ असे आहे. भारत आणि चीन यांच्यात दोन वर्षांपूर्वी लडाख येथे जो संघर्ष झाला होता, त्या संदर्भात काही आशय या पुस्तकात आहे, असे बोलले जाते. तसेच या पुस्तकात केंद्र सरकारच्या त्यावेळच्या धोरणावरही काही टिप्पणी केली आहे, असाही आरोप आहे. गांधी यांनी या पुस्तकाची प्रत दाखवून ते विदेशात प्रकाशित झाले आहे, असा दावा केला होता. तथापि, पेंग्विनने तो दावाही खोडून काढला.

नेमकी स्थिती काय…

या पुस्तकाच्या प्रकाशनाला अद्याप संरक्षण विभागाने अनुमती दिलेली नाही. हे पुस्तक परीक्षणासाठी संरक्षण विभागाकडे एक वर्षापूर्वी देण्यात आले आहे. मात्र, अद्याप परीक्षण पूर्ण न झाल्याने नियमानुसार त्याचे प्रकाशन करण्यात आलेले नाही. जो पर्यंत संरक्षण विभाग त्याच्या प्रकाशनाला अनुमती देत नाही, तो पर्यंत कायद्यानुसार त्याचे प्रकाशन केले जाऊ शकत नाही. अशा स्थितीत कोणाजवळही या पुस्तकाची तथाकथित प्रत असेल तर ती तत्काळ जप्त केली गेली पाहिजे, अशीही मागणी पेंग्विन या कंपनीने केली आहे. तसेच या पुस्तकाच्या बनावट प्रती बाजारात उपलब्ध असतील, तर त्याही जप्त झाल्या पाहिजेत. तसेच जे पुस्तक प्रकाशितच झालेले नाही. त्या पुस्तकाच्या प्रती विकल्या जाणे किंवा कोणाला त्या मिळणे, हा बौद्धिक संपदा संरक्षण कायद्याचा भंग असून संबंधितांच्या विरोधात कठोर कारवाई करण्यात यावी, असेही पेंग्विन या प्रकाशन संस्थेने स्पष्ट केले.

दोघांपैकी कोणीतरी आहे खोटे

या पुस्तकाच्या संदर्भात एकतर नरवणे खोटे बोलत आहेत, किंवा प्रकाशन कंपनी खोटे बोलत आहे, असा आरोप कंपनीच्या स्पष्टीकरणानंतर राहुल गांधी यांनी केला आहे. तथापि, त्यांच्याजवळ या पुस्तकाची प्रत कोठून आली, याचे उत्तर त्यांनी टाळले आहे. याच पुस्तकाचा उल्लेख गांधी यांनी काही दिवसांपूर्वी लोकसभेत केला होता. तसेच या पुस्तकासंबंधी एका डिजिटल नियतकालीकात प्रसिद्ध झालेल्या लेखाचाही संदर्भ घेण्याचा प्रयत्न केला होता. तथापि, जे पुस्तक प्रकाशित झालेले नाही, किंवा संसदेच्या कामकाजाचा भाग नाही, त्याचा संदर्भ नियमानुसार घेता येणार नाही, असे स्पष्ट करत लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी गांधी यांना या संदर्भात बोलण्याची अनुमती नाकारली होती. त्यामुळे काँग्रेस आणि गांधी यांनी बिर्ला यांच्यावर लोकशाहीची गळचेपी केल्याचा आरोप केला होता. आजही या पुस्तकावर संसदेत आणि संसदेच्या बाहेर वाद होत आहेत. मात्र, जर हे पुस्तक प्रकाशितच झाले नसेल, तर त्याची प्रत गांधी यांच्याजवळ कशी, हा प्रश्न अनुत्तरितच राहिला आहे. या पुस्तकाच्या अवैध प्रती जप्त केल्या जाव्यात अशी कंपनीची मागणी आहे. त्यामुळे गांधी यांच्याजवळची प्रत जप्त केली जाणार का, असाही प्रश्न उपस्थित झाला आहे. गांधी यांनी त्यांना प्रत कोठून मिळाली हे स्पष्ट केल्यास काही बाबी स्पष्ट होऊ शकतात. त्यामुळे त्यांनी त्यांच्याजवळच्या पुस्तकाची प्रत उघड करावी, अशीही मागणी करण्यात येत आहे. आता या सर्व वादावर संरक्षण विभाग आणि केंद्र सरकार काय करणार, हे पाहिले जात आहे.

Comments are closed.