बाबरी मशीद पुन्हा कधीच बांधली जाणार नाही.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ यांचे प्रतिपादन
► वृत्तसंस्था / लखनौ
बाबरी मशीदीचा अंत झाला आहे. आता बाबरी मशीद पुन्हा कधीही उभी राहणे अशक्य आहे. अगदी ‘अंतिम निर्णयाच्या दिवशी’ही ती उभी राहू शकणार नाही. जे लोक बाबरी पुन्हा उभी करण्याची स्वप्ने पहात आहेत, त्यांच्या पदरी नेहमीच निराशा पडणार आहे, असे प्रतिपादन योगी आदित्यनाथ यांनी केले आहे.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेशातील बाराबंकी येथे आयोजित जाहीर सभेत मंगळवारी भाषण करीत होते. भारतीय जनता पक्षाने आपले प्रत्येक आश्वासन पूर्ण केले आहे. आम्ही वारेमाप आश्वासने देत नाही. जेव्हढे करता येईल, तेव्हढेच बोलायचे, या तत्वावर आमच्या पक्षाचे काम चालते. रामजन्मभूमीच्या स्थानी रामलल्लांचे मंदिर निर्माण केले जाईल, असे आम्ही आश्वासन दिले होते. ते आम्ही पूर्ण केले आहे. राममंदिराचे निर्माणकार्य आम्ही पूर्णत्वास नेले आहे. अशा प्रकारे आमची कामे लोकांच्या दृष्टीसमोर आम्ही ठेवतो. आजही ज्यांना बाबरी मशीदीची स्वप्ने पडतात, त्यांची ती स्वप्ने कधीही पूर्ण होणार नाहीत. भारताचा ऐतिहासिक वारसा जपण्याचे आणि संवर्धित करण्याचे आमचे ध्येय आहे. भारताच्या समृद्ध परंपरा त्रिकालाबाधित आहेत, हे अनेकवेळा सिद्ध झाले आहे. रामजन्मभूमीच्या स्थानी निर्माण करण्यात आलेल्या भव्य राममंदिरावर फडकणारा भगवा धर्मध्वज हा भारताच्या सहस्रावधी वर्षांपासून चालत आलेल्या आणि कोणत्याही काळात चिरस्थायी राहिलेल्या समृद्ध सनातनी परंपरांचा प्रतिनिधी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते हा ध्वज फडकविण्यात आला. त्यांची ती पवित्र कृती सनातन धर्माच्या प्रतिष्ठेचे प्रतीक आहे. हा ध्वज भारतीयांच्या स्वाभिमानाचे मानचिन्ह आहे, अशी भलावण आदित्यनाथ यांनी केली.
केवळ संकटकाळी रामनाम अयोग्य
काही संधीसाधू लोक केवळ ते अडचणीत असताना रामाचा धावा करतात. इतर वेळी ते रामाला विसरतात. आता प्रभू रामचंद्रांनीही अशा लोकांकडे पाठ फिरविली आहे. ज्यांनी राममंदिराला विरोध केला आणि रामभक्तांवर गोळ्या चालविण्याचे पाप केले, अशा लोकांसाठी आता भारतात कोणतेही स्थान उरलेले नाही. आम्ही केवळ राममंदिराचे निर्माण करुन थांबलेलो नाही. आम्ही उत्तर प्रदेशात कायदा-सुव्यवस्था मोठ्या प्रमाणात सुधारली आहे. कायद्याचा भंग ज्याच्या हातून होईल, त्याला मोकळे सोडले जाणार नाही. जे कायद्याचे पालन करतील, त्यांची प्रगती होईल. जे कायद्याला धाब्यावर बसवितील, त्यांना परिणाम भोगावे लागतील. सनातन धर्माचेही हेच तत्व आहे. भारत आणि सनातन धर्म एकमेकांच्या हातात हात घालून चालतात. ते अविभक्त आहेत. भारत आणि सनातन धर्म या दोघांनाही खरा धोका जसा बाहेरुन आहे, तसाच तो देशातूनही आहे. प्रत्येक नागरिकाने हा धोका ओळखला पाहिजे आणि अत्यंत सावध राहिले पाहिजे. भारत आणि सनातन धर्म यांच्या विरोधात कटकारस्थाने होत आहेत, ही बाब उघड आहे. लोक सावध असतील, तर ही कारस्थाने उन्मळून पडण्यास वेळ लागणार नाही. असे प्रतिपादनही योगी आदित्यनाथ यांनी या भाषणात केले आहे.
Comments are closed.