सात लाख ठाणेकरांना हत्तीरोगमुक्तीचा डोस, भिवंडीपासून मोहीम सुरू

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

सात लाख ठाणेकरांना हत्तीरोगमुक्तीचा डोस देण्यात येणार आहे. या मोहिमेची सुरूवात आजपासूनच भिवंडीतून करण्यात आली असून टप्प्याटप्याने जिल्ह्यातील अन्य भागातही लसीकरण सुरू केले जाणार आहे. यासाठी 521 पथके तैनात केली आहेत. आरोग्य विभागाची ही मोहीम 23 फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली.

राज्यातील सहा जिल्ह्यांतील 16 तालुक्यांमध्ये हत्तीरोगमुक्त करण्यासाठी राज्य सरकारने मोहीम सुरू केली आहे. ठाणे जिल्ह्यात भिवंडी तालुक्यामध्ये ही मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेंतर्गत आरोग्य कर्मचारी घरोघरी भेट देऊन नागरिकांना हत्तीरोगविरोधी गोळ्या देणार आहेत. या अनुषंगाने भिवंडी तालुक्यात जनजागृतीसाठी मोबाईल आरोग्य जनजागृती व्हॅनचा वापर करण्यात येणार आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी रणजीत यादव यांच्या हस्ते या व्हॅनला हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ करण्यात आला.

531 पथके तैनात

भिवंडी तालुक्यातील एकूण लोकसंख्या 5 लाख 8 हजार 765 इतकी असून स्थलांतरित लोकसंख्या 2 लाख 3 हजार 284 इतकी आहे. यामध्ये वीटभट्ट्या, गोदामे, नवीन बांधकामे, कारखाने आदी ठिकाणी कार्यरत व्यक्तींचा समावेश आहे. दरम्यान, 7 लाख 12 हजार 49 नागरिकांना औषधे देण्यात येणार आहेत. यासाठी 531 पथके तयार करण्यात आली आहेत.

लहान मुले, गर्भवती महिलांनी औषधे टाळावीत

दोन वर्षांखालील मुले, गर्भवती महिला व गंभीर आजार असलेल्या व्यक्तींना औषधे देण्यात येणार नाहीत. औषधे उपाशीपोटी घेऊ नयेत तसेच आशा सेविका किंवा आरोग्य कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीतच सेवन करावीत असे आवाहन करण्यात आले आहे.

आजार नेमका काय?

हत्तीरोग हा गंभीर प्रश्न असून संक्रमित डास चावल्यामुळे पसरणारा व दीर्घकालीन अपंगत्व निर्माण करणाऱ्या प्रमुख आजारांपैकी एक आहे. बहुतांश वेळा बालवयात संसर्ग होतो. मात्र त्याची लक्षणे प्रौढावस्थेत दिसून येतात. या आजारामुळे शरीरातील रोगप्रतिकारकशक्ती कमी होते. त्यामुळे वेळीच प्रतिबंध न केल्यास शरीरावर सूज येते. या आजारावर कायमस्वरूपी उपचार उपलब्ध नसून प्रतिबंध हाच सर्वोत्तम उपाय आहे.

Comments are closed.