मथुरेत एकाच कुटुंबातील पाच जणांनी विष प्राशन केले

सामूहिक आत्महत्येमुळे उडाली खळबळ

वृत्तसंस्था/ मथुरा

उत्तरप्रदेशच्या मथुरेतील महावन क्षेत्रात एकाच परिवाराच्या 5 जणांनी विषप्राशन करत आत्महत्या केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी सर्व मृतदेह ताब्यात घेत चौकशी सुरू केली आहे. आत्महत्येच्या कारणांचा अद्याप शोध लागलेला नाही.

खप्पूर  पूर गावात ही धक्कादायक घटना घडली आहे. येथील 35 वर्षीय शेतकरी मनीष, त्याची पत्नी सीमा, दोन मुली हनी आणि प्रियांशी तसेच 2 वर्षीय  मुलगा पंकज यांचा मृतदेह मिळाला आहे. आत्महत्येपूर्वी सुसाइड नोटही लिहिण्यात आली होती. संबंधित घरात मनीष हा स्वत:ची पत्नी आणि मुलांसोबत राहत होता. तर त्याचे दोन भाऊ गावात वेगवेगळ्या घरांमध्ये राहत होते. घरात परिवाराच्या सर्व सदस्यांचे मृतदेह मिळाले आहेत. घरातील भिंतीवर ‘स्वत:च्या इच्छेने आत्महत्या करत आहे’ असा संदेश लिहिलेला होता. तसेच पोलिसांनी याप्रकरणी कुणालाच त्रास देऊ नये असे भिंतीवर लिहिले गेले होते. पोलिसांना याचबरोबर एका कागदावर सुसाइड नोटही मिळाली आहे. यातही भिंतीवरील मजकूरच लिहिला गेला आहे.  पतीच्या मोबाइलमध्ये 40 सेकंदांचा एक व्हिडिओ आढळून आला असून यात तो आत्महत्येबद्दल बोलताना दिसून येतो.

Comments are closed.