“चार वेळा काळ्या रंगाचे विमान होते, पण पाचव्यांदा…”, पिंकी माळीच्या वडिलांनाही घातपाताचा संशय, रोहित पवारांच्या आरोपांशी सहमत
बारामती विमानतळाजवळ झालेल्या विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. या अपघाताबाबत शंका उपस्थित होत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार आणि अजितदादांचे पुतणे रोहित पवार यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेत अपघातामागे घातपात असल्याची शक्यता वर्तवली. रोहित पवार यांच्याशी फ्लाईट अटेंडन्ट पिंकी माळी हिचे वडीलही सहमत आहेत. त्यांनीही यावर आपले मत व्यक्त केले. विमानाचा रंग अचानक का बदलला? असा सवाल त्यांनी टीव्ही-9 या वृत्तवाहिनीशी बोलताना केला.
रोहित पवार यांच्या मताशी मी सहमत आहे. कारण घातपात झाल्याची शंका घ्यायला वाव आहे. पिंकीने याआधी चार वेळा अजित पवार यांच्यासोबत प्रवास केला होता. त्या चारही वेळी काळ्या रंगाचे विमान होते. परंतु पाचव्या प्रवासावेळी अचानक पांढऱ्या रंगाचे चार्टर्ड विमान का निवडण्यात आले? हा बदल कशासाठी होता? असा सवाल शिवकुमार माळी यांनी केला.
रोहित पवारांनी सांगितल्याप्रमाणे सकाळी ट्रॅफिकची कोणतीही समस्या नसते, तरीही ऐनवेळी वैमानिक का बदलला गेला? या सर्व गोष्टी योगायोग नसून सखोल चौकशीचा विषय असल्याचे पिंकी माळी हिच्या वडिलांनी नमूद केले. अपघातापूर्वी पिंकीने आपल्याशी फोनवरून संवाद साधल्याचेही त्यांनी सांगितले.
पिंकीने अपघाताच्या काही काळ आधी फोनवर संवाद साधला होता. “मला खूप काही बोलायचे आहे, बारामतीला पोहोचल्यावर सविस्तर बोलेन,” असे तिने वडिलांना सांगितले होते. मात्र, त्या संवादापूर्वीच हा काळाने झडप घातली.
विमान अपघात संशयास्पद; रोहित पवार यांचा बॉम्ब, अजितदादांचा ‘मोसाद’ पद्धतीने घातपात
अपघातानंतर कंपनीने साधी विचारपूस करण्यासाठीही फोन केला नाही. आम्ही स्वतः बारामतीला जाऊन मृतदेह ताब्यात घेतला, अन्यथा तोही आम्हाला मिळाला नसता. पिंकीचे वेतन, विमा किंवा इतर कोणत्याही बाबींवर कंपनी बोलायला तयार नाही, असा आरोपही पिंकीच्या वडिलांनी केला.
Comments are closed.