थायलंडमध्ये गोळीबाराच्या दोन विविध घटनेत 22 मुलांसह 34 जणांचा मृत्यू

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

थायलंडमध्ये आज एकापाठोपाठ झालेल्या दोन भीषण गोळीबाराच्या घटनांनी संपूर्ण देश हादरून गेला आहे. देशाच्या उत्तर भागात एका माजी पोलीस अधिकाऱ्याने डे-केअर सेंटरमध्ये केलेल्या अमानुष हल्ल्यात 22 चिमुरड्यांसह एकूण 34 जणांचा मृत्यू झाला आहे. थायलंडच्या इतिहासातील ही आतापर्यंतची सर्वात भयानक आणि घातक सामूहिक गोळीबाराची घटना मानली जात आहे. या घटनेमुळे संपूर्ण देशात शोककळा पसरली असून नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एका माजी पोलीस अधिकाऱ्याने अचानक डे-केअर सेंटरमध्ये घुसून अंदाधुंद गोळीबार सुरू केला. या हल्ल्यात निष्पाप मुले आणि प्रौढ व्यक्तींना आपला जीव गमवावा लागला. स्थानिक प्रशासनाने दिलेल्या आकडेवारीनुसार, या भीषण नरसंहारात 34 लोकांचा मृत्यू झाला आहे. पोलीस सध्या या हल्लेखोराच्या कृत्यामागील नेमका हेतू शोधण्याचा प्रयत्न करत असून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.

दुसरीकडे, दक्षिण थायलंडमधील हाटयाई येथील एका शाळेतही गोळीबाराची घटना घडली आहे. येथे एका 18 वर्षीय तरुणाने केलेल्या गोळीबारात दोन लोक गंभीर जखमी झाले असून त्याने एका महिला कर्मचाऱ्याला ओलीस ठेवल्याने खळबळ उडाली आहे. एकाच दिवसात घडलेल्या या दोन वेगवेगळ्या घटनांमुळे थायलंडमधील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. पोलीस या दोन्ही घटनांचा तपास करत असून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

Comments are closed.