तो विश्वचषक आणि मियांदादच्या बेडूक उड्या! जाणून घ्या भारत-पाकिस्तान मधला रंजक किस्सा

आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धेच्या वेळापत्रकाची घोषणा झाली, त्यावेळी एकच गोष्ट तुफान चर्चेत होती, ती म्हणजे भारत- पाकिस्तान सामना केव्हा होणार? ठरलेल्या वेळापत्रकानुसार भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ १५ फेब्रुवारीला आमनेसामने येणार होते. पण पाकिस्तानने आधी सामना खेळण्यास नकार दिला होता. शेवटपर्यंत पाकिस्तानचा संघ नाहीचा पाडा म्हणत राहिला. पण अखेर पाकिस्तानने भारताविरूद्ध खेळण्यास होकार दिला आहे. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना अॅक्शन पॅक सामना पाहायला मिळणार आहे. दरम्यान भारत- पाकिस्तान सामना म्हटलं, तर या दोन्ही संघांदरम्यान झालेल्या वादांची नेहमीच चर्चा होते. लाईव्ह सामन्यात पाकिस्तानचा माजी खेळाडू जावेद मियांदादने केलेला डान्स कोणीच विसरू शकणार नाही. नेमकं काय घडलं होतं? जाणून घ्या.

भारतीय संघातील माजी यष्टीरक्षक फलंदाज किरण मोरे हे सर्वात चपळ यष्टीरक्षकांपैकी एक होते. १९९२ चा वर्ल्डकप ऑस्ट्रेलियात पार पडला होता. तर भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेला सामना ४ मार्च १९९२ ला सिडनीच्या मैदानावर पार पडला होता. भारत-पाकिस्तान हे दोन्ही संघ जेव्हा जेव्हा आमनेसामने येतात, तेव्हा दोन्ही संघांमध्ये हाय व्हॉल्टेज सामना पाहायला मिळत असतो. या सामन्यातही असंच काहीसं चित्र पाहायला मिळालं होतं.

जावेद मियांदाद फलंदाजी करत असताना यष्टीमागे असलेले किरण मोरे सतत अपील करत होते. हे जावेद मियांदादला मुळीच आवडलं नव्हतं. त्यावेळी सचिन तेंडुलकर गोलंदाजी करत होता. जावेद मियांदादने याच षटकात मिड ऑफला शॉट मारला आणि वेगाने धाव घेण्यासाठी पळत सुटला. पण धाव पूर्ण होण्याआधीच तो धावबाद झाला असता. त्यामुळे तो माघारी परतला. इतक्यात किरण मोरे यांनी पुन्हा एकदा बेल्स उडवली आणि पुन्हा एकदा अपील केली. हे पाहताच जावेद मियादांदला संताप अनावर झाला आणि तो खेळपट्टीवर उडी मारून डान्स करू लागला. त्याने ३ वेळा बेडूक उडी मारली. पण तो पाकिस्तानला हा सामना काही जिंकून देऊ शकला नाही. भारताने हा सामना ४३ धावांनी आपल्या नावावर केला होता.

आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धेत भारत- पाकिस्तान हे दोन्ही संघ पुन्हा एकदा आमनेसामने येणार आहेत. हा सामना श्रीलंकेतील कोलंबोत होणार आहे. गेल्यावेळी हे दोन्ही संघ आशिया चषक २०२५ स्पर्धेत आमनेसामने आले होते. दोन्ही संघांमध्ये ३ सामने झाले, या तिन्ही सामन्यांमध्ये भारतीय संघाने बाजी मारली.भारताने अंतिम फेरीतही पाकिस्तानचा पराभव केला होता.

Comments are closed.