मुंबईच्या महापौरपदी रितू तावडे, उपमहापौरपदी संजय घाडी; पालिकेतील प्रशासकराज समाप्त…

मुंबई महानगरपालिकेमध्ये गेल्या चार वर्षांपासून सुरू असलेले प्रशासक आयुक्तांचे राज्य संपले असून खऱ्या अर्थाने लोकप्रतिनिधींचे राज्य सुरू झाले आहे. पालिकेत आज महापौर म्हणून महायुतीच्या रितू तावडे तर उपमहापौर म्हणून संजय घाडी यांची बिनविरोध निवड झाली. दोन्ही पदांसाठी प्रत्येकी एकच अर्ज आल्यामुळे दोन्ही पदांची बिनविरोध निवड झाल्याचे अध्यक्षस्थानी अधिकारी आयुक्त ग्रेस गगराणी यांनी जाहीर केले. यावेळी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार घोषणाबाजी झाली. सत्ताधारी पक्षाकडून विरोधकांना डिवचण्याचा प्रयत्न केल्यामुळे विरोधकांनी सत्ताधाऱ्यांसह त्यांना सहयोग करणाऱ्या प्रशासनाचाही निषेध केला.

महापौर आणि उपमहापौर पदांसाठी प्रत्येकी एकच अर्ज आल्यामुळे निवडणूक बिनविरोध होणार हे स्पष्ट झाले होते. त्यानुसार आज झालेल्या महासभेत पीठासीन अधिकारी गगराणी यांनी ही अधिकृत घोषणा केली. मात्र प्रचलित प्रथेनुसार पीठासीन अधिकारी म्हणून ज्येष्ठ नगरसेवकाने काम पाहणे गरजेचे असताना शिवसेनेच्या ज्येष्ठ नगरसेवकांना डावलून भाजपने कारस्थानाने नियम बदलल्याचे सांगत आयुक्तांची पीठासीन अधिकारी म्हणून नेमणूक करून महापौर निवडणूक पार पाडली.

शिवसेनेने उपस्थित केलेला हरकतीचा मुद्दाही पीठासीन अधिकारी म्हणून आयुक्तांनी फेटाळून लावला. महापौर, उपमहापौर निवडीप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रेक्षक गॅलरीत उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीत भाजप आणि पालिका प्रशासनाची मनमानी सुरूच होती.

सत्ताधाऱ्यांनी ‘मोदी मोदी, देवाभाऊ आगेबढो, हम तुम्हारे साथ है’, ‘भारतीय जनता पार्टीचा विजय असो’, ‘महापौर कुणाचा महायुतीचा’ आदी घोषणा दिल्या, मात्र शिवसेनेच्या शिलेदारांनी त्यांना चोख प्रत्युत्तर दिले.

पालिकेत घुमला 'ठाकरें'चा आवाज!

पीठासीन अधिकारी निवडीत डावलून मनमानी करणाऱ्या भाजप, शिंदे गटाचा शिवसेनेकडून जोरदार निषेध करण्यात आला. ‘50 खोके, एकदम ओके’, ‘गद्दार गद्दार’, ‘चोर है, चोर है’… अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. ‘शिवसेना झिंदाबाद’, ‘जय भवानी जय शिवाजी’, ‘ठाकरे… ठाकरे’ असा एकच जयघोष सुरू राहिल्याने पालिकेत पुन्हा एकदा ‘ठाकरें’चा आवाज घुमला.

काँग्रेसकडून निषेध

महापौर निवडीसाठी झालेल्या महासभेत सहभागी होण्यासाठी काँग्रेस नगरसेवक आले असताना त्यांच्यासाठी निश्चित केलेल्या जागेवर शिंदे गटाचे नगरसेवक बसलेले होते. त्यामुळे बसण्यास जागा मिळाली नसल्याचा निषेध करीत जमिनीवर बसून प्रशासन, सत्ताधाऱ्यांविरोधात घोषणाबाजी केली.

Comments are closed.