काँग्रेसच्या दबावानंतर द्रमुकने समितीची घोषणा केली

जागावाटप समिती स्थापन करणार : तामिळनाडू विधानसभा निवडणुकीची पार्श्वभूमी

वृत्तसंस्था/ चेन्नई

तामिळनाडूत यंदा होणाऱ्या विधानसभा निवडणुकीवरून राजकारण गतिमान झाले आहे. याचदरम्यान राज्यातील सत्तारुढ द्रमुकने जागावाटपावरून मोठी घोषणा केली आहे. जागावाटप चर्चा सुरू करण्यासाठी एक समिती स्थापन करणार आहोत. ही समिती 22 फेब्रुवारीपासून स्वत:चे काम सुरू करणार असल्याचे द्रमुककडून सांगण्यात आले. यापूर्वी द्रमुकचा प्रमुख सहकारी काँग्रेसने जागावाटपावरील चर्चा सुरू न झाल्याप्रकरणी चिंता व्यक्त केली होती.

जागावाटपासाठी चर्चा सुरू करण्याकरता आम्ही पुढाकार घेतला होता, परंतु द्रमुककडून कुठलेच पाऊल उचलण्यात आले नसल्याचे काँग्रेसचे सांगणे होते. डिसेंबर महिन्यात द्रमुक अध्यक्ष एम.के. स्टॅलिन यांची भेट घेत चर्चा करण्यासाठी 5 सदस्यीय समिती काँग्रेसने स्थापन केली होती. परंतु द्रमुककडून याप्रकरणी आतापर्यंत कुठलीच समिती स्थापन करण्यात आली नव्हती. जागा आणि उमेदवार लवकर निश्चित करणे आवश्यक होते. अंतिम कालावधीत जागा निश्चित केल्यास निवडणुकीची तयारी प्रभावित होऊ शकते असे काँग्रेसने म्हटले होते.

द्रमुकचे स्पष्टीकरण

द्रमुक्रने याप्रकरणी कार्यकर्ते निवडणुकीच्या तयारीत व्यग्र असल्याचे सांगत मतदार यादीचे अपडेट पूर्ण झाले असून पक्षाचे पदाधिकारी सदस्यत्व अभियान, बूथ एजंट प्रशिक्षणात सामील असल्याचे म्हटले आहे. राज्यात जागावाटप लवकर निश्चित करण्यासाठी आम्हीही प्रयत्नशील आहोत, याकरता लवकरात लवकर घटक पक्षांसोबत चर्चा सुरू केली जाईल असा दावा द्रमुककडून करण्यात आला आहे.

द्रमुककडून तयारी

द्र्रमुकने निवडणूक घोषणापत्र तयार करण्यासाठी एक समिती स्थापन केली असून ती तामिळनाडूचा दौरा करत लोकांच्या गरजांची माहिती अन् सूचना जमवत आहे. समितीला आतापर्यंत 75 हजार सूचना आणि विनंती प्राप्त झाल्या आहेत. पक्षानुसार तामिळनाडूचा अंतरिम अर्थसंकल्प 17 फेब्रुवारी रोजी विधानसभेत मांडला जाणार असून यानंतर जागावाटपाच्या चर्चेला वेग देणार आहे.

Comments are closed.