व्यापार करारावर राहुल गांधींची टीका

भाजप विशेषाधिकार हनन प्रस्ताव आणणार, गांधी यांनी लोकसभेत दिशाभूल केल्याचा पक्षाचा आरोप

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

लोकसभेत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार करारावर टीका केली आहे. हा करार भारताच्या हितांच्या विरुद्ध असून यामुळे भारतातील शेतकरी देशोधडीला लागणार आहे. तसेच भारत अमेरिकेवर अधिकाधिक अवलंबून राहणार आहे. हा करार भारताच्या हिताचा नसून अमेरिकेच्या हिताचा आहे, असे प्रतिपादन राहुल गांधी यांनी केले. ते केंद्रीय अर्थसंकल्पावरील चर्चेत भाग घेत असताना लोकसभेत भाषण करीत होते.

भाषणात त्यांनी आपण अमेरिकेशी कशी चर्चा केली असती, यासंबंधीही प्रतिपादन करण्याचा प्रयत्न केला. भारताचा डाटा हा महत्वाचा मुद्दा आहे. या डाटाच्या मुद्द्याचा उपयोग आम्ही अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी चर्चा करताना कसा केला असता, हे स्पष्ट करण्याचाही त्यांनी प्रयत्न केला आहे. भारताच्या विद्यमान सरकारने अमेरिकेशी योग्यप्रकारे चर्चा केली नाही. त्यामुळे भारताची हानी झाली आहे, असे प्रतिपादनही राहुल गांधी यांनी भाषणात केले.

भारताची केली विक्री

अमेरिकेशी करार करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताची आणि भारताच्या हितांची विक्री केली आहे, असा आरोप गांधी यांनी केला. या करारामुळे भारताचे उद्योग आणि कृषी क्षेत्र यांची अपरिमित हानी होणार आहे. भारताच्या रोजगारांवर परिणाम होणार आहे. तसेच अमेरिकेची धन होणार आहे. हा करार भारताचे अहित करणारा आहे, असे अनेक आरोप त्यांनी केले. त्यांनी केंद्र सरकारमधील महत्वाच्या मंत्र्यांवर आणि नेत्यांवर बरीच टीका-टिप्पणीही केली. भारताची विक्री करताना आपल्याला लाज कशी वाटली नाही, असा प्रश्नही केला.

एपस्टिन फाईल्सचा उल्लेख

राहुल गांधी यांनी भाषणात एपस्टिन फाईल्सचाही उल्लेख केला आहे. या फाई&ल्समध्ये केंद्रीय मंत्री हरदीपसिंग पुरी आणि अनिल अंबानी यांची नावे आहेत. पुरी यांचा या एपस्टिन प्रकरणात सहभाग आहे, हे या फाईल्सवरुन स्पष्ट हेत आहे, असा गंभीर आरोपही गांधी यांनी केला. नंतर पुरी यांनी हे सर्व आरोप फेटाळले आहेत.

भारतीय डाटा महत्वाचा

अमेरिकेची भारतीय डाटावर दृष्टी आहे. हा डाटा भारताचे अॅसेट आहे. अमेरिकेला तो हवा आहे. या स्थितीचा उपयोग अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी बोलताना आम्ही केला असता. जर आमचे सरकार असते, तर आम्ही ट्रम्प यांच्याशी अधिक प्रभावीपणे आणि भारताच्या अटींवर चर्चा केली असती, असा दावाही गांधी यांनी केला. अमेरिकेला आपल्या डॉलरचे महत्व कायम ठेवायचे आहे. त्यासाठी त्यांच्या दृष्टीने भारताचा डाटा महत्वाचा आहे, असे राहुल गांधी यांचे म्हणणे होते. तथापि, त्यांना ‘डाटा’ म्हणजे नेमके काय अपेक्षित आहे आणि त्याचा अमेरिकेच्या चलनाशी संबंध काय आहे,  हे त्यांच्या भाषणावरून स्पष्ट होत नाही, असे मत या क्षेत्रातील अनेक तज्ञांनी त्यांच्या भाषणानंतर व्यक्त केले. तसेच इलेक्ट्रॉनिक ट्रान्समिशनच्या संदर्भात अमेरिकेने तिच्या सुधारीत करार प्रारुपात अनेक परिवर्तने केली असल्याने आता हा मुद्दा संदर्भहीन झाला आहे, असेही तज्ञांचे मत आहे. त्यामुळे गांधी यांचा हा मुद्दा वादग्रस्त ठरणे शक्य आहे.

नोकऱ्या कमी होणार

हा करार आणि कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वाढता उपयोग यांच्यामुळे भारतातील नोकऱ्या कमी होणार आहेत, असेही राहुल गांधी यांचे म्हणणे आहे. तथापि, त्यासंबंधी सविस्तर माहिती आणि आकडेवारी त्यांनी विशेषत्वाने सादर केली नाही. तसेच, कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा स्वीकार केला नाही, तर भारत जागतिक स्पर्धेत कोणत्या स्थितीत असेल, याचीही चर्चा त्यांनी केली नाही, असा आक्षेप नंतर अनेकांनी त्यांच्या भाषणावर सोशल मिडियातून घेतल्याचे दिसत आहे.

विशेषाधिकार हनन प्रस्ताव आणणार

राहुल गांधी यांनी त्यांच्या लोकसभेत केलेल्या भाषणाच्या माध्यमातून सभागृहाची दिशाभूल केली आहे. त्यांनी भारताची विक्री केल्याचा ठपका सरकारवर केला आहे. हा दिशाभूल करणारा आरोप आहे. तसेच त्यांनी एपस्टिन फाईल्स प्रकरणात केंद्रीय मंत्री हरदीप पुरी यांच्यावर बिनबुडाचे आणि धादांत खोटे आरोप केले आहेत. त्यामुळे त्यांच्या विरोधात विशेषाधिकार हनन प्रस्ताव आणण्यासाठी भारतीय जनता पक्षाने सज्जता केली आहे. ही माहिती संसदीय कामकाजमंत्री किरेन रिजिजू यांनी दिली आहे. गांधी यांचे लोकसभेतील भाषण धादांत गैरआरोपांनी आणि खोट्या माहितीने भरलेले होते. त्यामुळे आता त्यांच्याविरोधात हनन प्रस्तावाची कारवाई करण्याची वेळ आली आहे, असेही रिजिजू यांनी स्पष्ट केले आहे.

भाषण आणि खंडन

ड भाषणातील आरोपांना दिलेल्या प्रत्युत्तर न ऐकताच गांधी सभागृहाबाहेर

ड भारताचा अमेरिकेशी व्यापार करारावर गांधी यांच्या भाषणाचा मुख्य भर

ड एपस्टीन फाईल्सचाही लोकसभेत उल्लेख, भाजपकडून जोरदार प्रत्युत्तर

Comments are closed.