त्यांच्या विजयापेक्षा तुझ्या पराभवाचीच चर्चा जास्त; युवराज सिंगने अफगाणी फलंदाजाचे मनोबल वाढवले

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या थरारक सामन्यात अफगाणिस्तानला डबल सुपर ओव्हरमध्ये पराभव स्वीकारावा लागला. या रोमांचक लढतीनंतर अफगाणिस्तानच्या तंबूमध्ये निराशेचे वातावरण होते. विशेषत: संघाचा स्टार फलंदाज रहमानुल्लाह गुरबाज अत्यंत भावुक दिसून आला. त्याची ही खंत पाहून दिग्गज युवराज सिंगने त्याचे मनोबल वाढवले.
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करत 187 धावा केल्या. प्रत्युत्तरात अफगाणिस्ताननेही तितक्याच 187 धावा करत सामना बरोबरीत सोडवला. त्यानंतर पहिल्या सुपर ओव्हरमध्येही दोन्ही संघांचे धावा समान राहिले. अखेरीस दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये दक्षिण आफ्रिकेने बाजी मारली.
सामन्यात गुरबाजने अक्षरशः धावांचा पाऊस पाडला. त्याने केवळ 42 चेंडूंमध्ये 84 धावांची तुफानी खेळी केली. या खेळीत 4 चौकार आणि 7 षटकारांचा समावेश होता. 200 च्या स्ट्राइक रेटने फलंदाजी करत त्याने संघाला विजयाच्या उंबरठ्यावर आणून ठेवले होते. मात्र संपूर्ण संघ 19.4 षटकांत 187 धावांवर बाद झाला आणि सामना टाय झाला.
सुपर ओव्हरमध्येही गुरबाजचा आक्रमक अंदाज कायम राहिला. दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये दक्षिण आफ्रिकेने 23 धावा केल्या आणि अफगाणिस्तानसमोर 24 धावांचे लक्ष्य ठेवले. केशव महाराजच्या षटकातील पहिल्या दोन चेंडूंवर अफगाणिस्तानला धक्का बसला. त्यानंतर गुरबाजने सलग तीन षटकार ठोकत सामना पुन्हा रंगतदार केला. मात्र शेवटच्या चेंडूवर मोठा फटका मारण्यात तो अपयशी ठरला आणि बाद झाला. त्यामुळे अफगाणिस्तानचा पराभव झाला.
युवराज सिंगने गुरबाजचे उत्कृष्ट प्रयत्न व्यर्थ गेल्यानंतर त्याला “जादूगार” म्हटले आहे. सोशल मीडियावर भावनिक संदेश देताना युवराज म्हणाला, “रहमानउल्लाह गुरबाज, निराश होऊ नकोस. तू शेवटच्या चेंडूपर्यंत तुझ्या संघासाठी आणि देशासाठी लढलास.” युवराज पुढे म्हणाला की जे कधीही हार मानत नाहीत त्यांनाच “जादूगार” म्हटले जाते. या दिग्गज भारतीय खेळाडूच्या मते, आज दक्षिण आफ्रिकेच्या विजयापेक्षा अफगाणिस्तानच्या पराभवाची जास्त चर्चा होईल.
युवराजसारख्या दिग्गज खेळाडूकडून मिळालेल्या या पाठिंब्यामुळे गुरबाज आणि संपूर्ण अफगाण संघाचे मनोबल निश्चितच उंचावले आहे. या सामन्याची आणि गुरबाजच्या जिद्दीची चर्चा क्रिकेटविश्वात दीर्घकाळ होत राहणार आहे.
Comments are closed.