आज 'भारत बंद'ची हाक

बँका, शाळा, वाहतूक बंद राहण्याची शक्यता

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

विविध क्षेत्रांमधील कामगार संघटना आणि शेतकरी संघटनांनी आज गुरुवारी ‘भारत बंद’चे आवाहन केले आहे. केंद्र सरकारने केलेले नवे कामगार कायदे, आंतरराष्ट्रीय व्यापार करार, तसेच नवे ग्रामीण कायदे यांना विरोध करण्यासाठी या बंदचे आवाहन करण्यात आले आहे, असे प्रतिपादन या संघटनांनी केले आहे.

रुग्णालये, अत्यावश्यक सेवा आणि इतर काही कार्यांना या बंदमधून मुक्त ठेवण्यात आले आहे. तरीही, बँका, वित्तसंस्था आणि शाळा तसेच वाहतूक बंद राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे या बंदचा परिणाम जनजीवनावर होईल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. औद्योगिक क्षेत्रही बंद राहण्याची शक्यता आहे.

नव्या कामगार संहितेला विरोध

केंद्र सरकारने नुकत्याच चार नव्या कामगार संहिता लागू केल्या आहेत. मात्र, काही कामगार संघटनांनी त्यांना विरोध केला आहे. या नव्या कायद्यांमुळे रोजगार सुरक्षा धोक्यात आली असून कर्मचाऱ्यांनी संघटित शक्ती कमी होणार आहे, असा काही कामगार संघटनांचा आरोप आहे. काही शेतकरी संघटनांचाही या बंदला पाठिंबा आहे. भारताने अमेरिकेशी केलेल्या कराराला या संघटनांचा विरोध आहे. भारताच्या कृषीक्षेत्राची हानी या करारामुळे होईल, असा त्यांचा आरोप आहे. काही संघटनांनी नव्या व्हीबी जी राम जी या रोजगार हमी योजनेला विरोध केला आहे.

जुन्या पेन्शन योजनेची मागणी

काही संघटनांनी जुनी पेन्शन योजना लागू करावी अशी मागणी केली आहे. तसेच किमान 9 हजार रुपयांचे मासिक निवृत्तीवेतन प्रत्येक निवृत्त कर्मचाऱ्याला लागू करावे अशी त्यांची मागणी आहे. तसेच सार्वजनिक क्षेत्रांमधील उद्योगांचे खासगीकरण करु नये, अशीही मागणी काही संघटनांनी आहे. एआयबीईए आणि बीईएफआय या संघटनांचा समावेश या बंदमध्ये असल्याने बँकिंग क्षेत्रावर परिणाम होण्याची शक्यता आहे. आज गुरुवारी बँका चालू राहणार आहेत, असे स्पष्टीकरण स्टेट बँक ऑफ इंडियाच्या व्यवस्थापनाने केले आहे. मात्र चेक क्लिअरन्स, बँकेतून पैसे काढणे, आदी व्यवहारांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. शाळा आणि महाविद्यालये यांना या बंदमध्ये अधिकृतरित्या समाविष्ट करुन घेण्यात आलेले नाही. मात्र, काही राज्यांमध्ये या संस्था बंद राहण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

वाहतूक संघटनांचा पाठिंबा

देशातील काही वाहतूक संघटनांनी बंदला पाठिंबा दिल्याने सार्वजनिक वाहतुकीवर परिणाम होणे शक्य आहे. सरकारी बसेस, रिक्षा, इतर वाहने काही स्थानी बंद राहणे शक्य आहेत. विमाने आणि रेल्वे बंद राहणार नाही. तथापि, विमानतळ आणि रेल्वेस्थानकांपर्यंत पोहचणे प्रवाशांना कठीण होण्याची शक्यता आहे. बंदला प्रारंभ झाल्यानंतरच त्याचा प्रभाव किती आहे, हे समजून येणार आहे.

Comments are closed.