मोहालीतील 16 शाळा उडवण्याची धमकी
पंजाब बॉम्बनाशक पथकाकडून तपासणी
वृत्तसंस्था/ मोहाली
पंजाबमधील मोहाली येथील 16 खासगी शाळांना बॉम्बने उडवण्याच्या धमक्यांचे ई-मेल आल्यामुळे घबराट पसरली. या धमकीनंतर शाळा रिकामी करण्यात आल्या. पोलिसांनी बॉम्बनाशक पथकाला आमंत्रित करून कसून तपासणी केली. मात्र, तपासणीत कोणतीही संशयास्पद वस्तू सापडली नाही.
धमकीसंबंधीची माहिती मिळाल्यानंतर शाळांमध्ये अलर्ट जारी करत सर्व विद्यार्थ्यांना घरी पाठवण्यात आले. शाळांमध्ये सुरक्षा वाढवण्यात आली आहे. पोलीस आणि सुरक्षा एजन्सी सतर्क झाल्या. पोलिसांनी संबंधित शाळेचा परिसर सील करत चौकशी सुरू केली आहे. या तपासणीवेळी कोणालाही प्रवेशद्वारातून आत जाऊ दिले जात नव्हते. आता सरकारी शाळांना प्राप्त झालेले ईमेल तपासण्याचे निर्देश देखील देण्यात आले आहेत. ई-मेल पाठविणाऱ्याचा शोध तपास यंत्रणांकडून घेतला जात आहे. बॉम्बच्या धमक्या मिळालेल्या शाळांमध्ये मानव मंगल स्कूल, शिवालिक पब्लिक स्कूल आणि लर्निंग पाथ्स सारख्या प्रमुख शाळा समाविष्ट आहेत.
Comments are closed.