मुख्यमंत्र्यांचे आदेश डावलले; पुण्यात भाजपकडून शहर विद्रुपीकरण, महापौरांच्या अभिनंदनाची शहरभर फ्लेक्सबाजी

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

होर्डिंग्ज आणि फ्लेक्स लावून पुण्याचे विद्रुपीकरण करू नका, असा सल्लावजा आदेश स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिका निवडणुकीत दिला होता. मात्र निवडणूक संपताच भाजपने हा आदेश धाब्यावर बसवला आहे. महापौर पदी मंजुषा नागपुरे आणि उपमहापौर पदी परशुराम वाडेकर यांची निवड झाल्यानंतर शहरभर त्यांच्या अभिनंदनाचे फ्लेक्स लागले आहेत. त्यामुळे सत्तेवर येताच भाजपने उन्माद सुरू केल्याची चर्चा शहरात आहे.

अनधिकृत फ्लेक्समुळे वाहतूक, सुरक्षितता, सौंदर्य आणि पर्यावरणाचे प्रश्न निर्माण झाले आहेत. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीत स्पष्ट भूमिका घेत शहरात अनधिकृत फ्लेक्स लावू नयेत, असे आवाहन केले होते. मुख्यमंत्र्यांच्या आवाहनानंतर शहर भाजपने फ्लेक्समुक्त पुणे करण्याचा निर्णय घेत, यापुढे कोणत्याही परिस्थितीत भाजप कार्यकर्त्यांनी फ्लेक्स लावू नयेत, अशा स्पष्ट सूचना निवडणुकीदरम्यान पत्रकार परिषद घेऊन भाजप प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे यांनी दिल्या होत्या.

प्रत्यक्षात महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर शहरभर सर्वपक्षीय नगरसेवकांच्या अभिनंदनाचे फ्लेक्स लागले. 9 फेब्रुवारी रोजी महापौर, उपमहापौर यांची निवड झाली. त्यानंतर शहरभर अनधिकृत फ्लेक्सबाजीला ऊत आला आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात बाजीराव रस्ता, शनिवार पेठ, शुक्रवार पेठ, नवी पेठेसह स्वारगेट, सिंहगड रस्ता, धायरी, महर्षिनगर आदी भागांत अभिनंदनाच्या नावाखाली महापौरांचे फ्लेक्सच फ्लेक्स उभे राहिले आहे. मुख्यमंत्र्यांचे आदेश त्यांचे पक्षाचे कार्यकर्ते पाळत नसतील तर यावर कारवाई तरी कोण करणार असा सवाल उपस्थित होत आहे.

कार्यकर्त्यांनी फ्लेक्स लावले असतील तर अनधिकृत सर्व फ्लेक्स काढून घेण्याच्या सूचना दिल्या जातील.
– मंजुषा नागपुरे, महापौर पुणे.

Comments are closed.